उत्तर पंचायत समितीत २२ वर्षात बदलले ३२ बीडीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:26 AM2021-08-14T04:26:38+5:302021-08-14T04:26:38+5:30
सोलापूर : तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या सततच्या तक्रारी व अधिका-यांकडून निर्माण केल्या जाणा-या अडचणीमुळे उत्तर सोलापूर तालुक्याला २२ वर्षात तब्बल ...
सोलापूर : तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या सततच्या तक्रारी व अधिका-यांकडून निर्माण केल्या जाणा-या अडचणीमुळे उत्तर सोलापूर तालुक्याला २२ वर्षात तब्बल ३२ गटविकास अधिकारी (बीडीओ) मिळाले. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या विद्यमान पदाधिका-यांच्या साडेचार वर्षांत १० बीडीओ आले, तर एकाला रूजूही होता आले नाही.
अवघे चार सदस्य संख्या असलेली उत्तर सोलापूर तालुका पंचायत समिती. मात्र, राजकीय मतभेदामुळे प्रशासनाचे कधी फावते, तर कधी चांगले काम करणा-या अधिकाऱ्याला त्रासही होतो. यामुळे या तालुक्याला २२ वर्षात ३२ अधिका-यांना बीडीओंच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये दीर्घकाळ महादेव बेळळे, रमेश जोशी व शिवाजी करडे यांनी १३ वर्षे काम पाहिले आहे.
उर्वरित ९ वर्षात तब्बल २९ अधिकाऱ्यांना बीडीओंच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली आहे. विद्यमान
पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा कालावधी साडेचार वर्षे पूर्ण झाला असून, या कालावधीत १० अधिकारी बदलले आहेत. पंचायत समितीचे ३३वे, तर या पदाधिकाऱ्यांच्या कालावधीतील ११वे गटविकास अधिकारी म्हणून प्रशांत देशमुख यांनी गुरुवारी सकाळी पदभार स्वीकारला. सभापती रजनी भडकुंबे यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार केला.
-----
सुळे परत आलेच नाहीत
बार्शीचे सहाय्यक बीडीओ महेश सुळे यांना उत्तरचा प्रभारी पदभार देण्यात आला होता. सायंकाळी पदभार घेऊन कार्यालयाबाहेर पडलेल्या सुळे यांना दुसऱ्या दिवशी कार्यालयात येण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे सुळे परत आलेच नाहीत.
---