भरारी पथकाकडून सोलापुरात ३२ लाख ८५ हजारांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:59 PM2019-04-06T12:59:26+5:302019-04-06T13:03:16+5:30

आतापर्यंत सोलापूर पोलीसांकडून ३३ गुन्हे दाखल; प्रचारासाठी वाहनांचाही गैरवापर, मोहोळ तालुक्यात सर्वाधिक रक्कम केली जप्त

32 lakh 85 thousand cash seized from Bharari team in Solapur | भरारी पथकाकडून सोलापुरात ३२ लाख ८५ हजारांची रोकड जप्त

भरारी पथकाकडून सोलापुरात ३२ लाख ८५ हजारांची रोकड जप्त

Next
ठळक मुद्देध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याने सांगोला तालुक्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला मोहोळ तालुक्यात भरारी पथकाने २३ लाख ५0 हजार रुपयांची रक्कम जप्त करून ताब्यात घेतलीफलटण तालुक्यात दोन लाख रुपयांची रक्कम निवडणूक यंत्रणेतील भरारी पथकाने ताब्यात घेतली

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक काळात संशयास्पदरित्या रोख रक्कम मिळून आल्याने ३२ लाख ८५ हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर प्रचारासाठी परवानगी नसताना वाहनांचा गैरवापर केल्याने ३३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मोहोळ तालुक्यात भरारी पथकाने २३ लाख ५0 हजार रुपयांची रक्कम जप्त करून ताब्यात घेतली आहे. सांगोला तालुक्यातील भरारी पथकाने ७ लाख ३५ हजारांची रक्कम जप्त केली आहे. तर फलटण तालुक्यात दोन लाख रुपयांची रक्कम निवडणूक यंत्रणेतील भरारी पथकाने ताब्यात घेतली आहे. 

जप्त करण्यात आलेली रक्कम कोणत्या कारणासाठी वापरण्यात येत होती, ती रक्कम आली कोठून, कोठे जात होती याबाबत चौकशी करून जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती यासाठी कार्यरत आहे. जप्त करण्यात आलेल्या रकमेची संपूर्ण माहिती घेऊन याबाबत अंतिम निर्णय या समितीकडून देण्यात येणार आहे. 

निवडणूक प्रचार करण्यासाठी वाहनांस परवानगी घेणे बंधनकारक आहे. निवडणूक कार्यालय व पोलीस यंत्रणेची परवानगी नसताना वाहनांवर प्रचाराचा झेंडा लावणे, राजकीय लोकप्रतिनिधींचे छायाचित्र लावणे, आदी कारणावरून २६ प्रकरणात भरारी पथकाने कारवाई केली आहे. याप्रकरणी या सर्व वाहनांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहर उत्तर मतदारसंघात १२ विनापरवानगी प्रचार वाहने दिसून आली आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात एक, पंढरपूर तालुक्यात एक वाहन आढळून आले आहे. माळशिरस तालुक्यात १२ प्रचार वाहने विनापरवानगी आढळून आल्याने याविरुध्द पोलीस कारवाई करण्यात आली आहे. 

ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याने सांगोला तालुक्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी बैठका घेणे, गैरभाष्य करणे आदी कारणावरून दक्षिण सोेलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय आचारसंहितेशी निगडीत बाबींचा अन्य विषयात शहर मध्य विधानसभा मतदारसंघात तीन व अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली. 

Web Title: 32 lakh 85 thousand cash seized from Bharari team in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.