सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार २२५ उमेदवारांसाठी चार तासात झाले ३२.५२ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 01:20 PM2021-01-15T13:20:40+5:302021-01-15T13:26:50+5:30
१२,२२५ उमेदवार रिंगणात ; २,७९५ केंद्रांवर शांततेत सुरू आहे मतदान
सोलापूर : जिल्ह्यातील ५९० ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. ५९० ग्रामपंचायतींमध्ये एकूण १२,२२५ उमेदवार आपली राजकीय शक्तीपणाला लावली आहे. यातूनच ५९० गावकारभारी प्रथम सदस्य म्हणून निवडून येणार आहे. पहिल्या चार तासात ३२.५२ टक्के मतदान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.
मतदानप्रक्रिया शांत आणि निपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. एकूण १८ हजार अधिकारी व कर्मचारी याकरिता परिश्रम घेत आहेत. एकूण २,२९६ प्रभागात निवडणूक होत आहे. यात ३ हजार ४७५ महिला उमेदवारदेखील महिला शक्तीचा जोर आजमावत आहेत.
जिल्ह्यात एकूण २०० गावे संवेदनशील आहेत. या ठिकाणी पाेलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त आहे. बहुतांश गावात निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. जिल्ह्यातील फक्त ६७ ग्रामपंचायतींना यात यश आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत २०० गावेे संवेदनशील आहेत. त्याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी पुणे, सांगली व सोलापूर शहरातून पोलीस बळ मागविण्यात आला आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.
————-
आरोग्य पथक तैनात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रासमोर विशेष काळजी घेतली जात आहे. मतदात्यांना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. मतदान केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटायझर देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्राच्या इमारतीबाहेर एक आरोग्य पथक तैनात करण्यात आला आहे. कोरोनासदृश्य स्थिती असलेल्या मतदारांना सायंकाळी साडेचार ते ५.३० दरम्यान मतदान करता येणार आहे.
तालुकानिहाय झालेले मतदान असे...(११.३० वाजेपर्यंत)
करमाळा - ३१.७४ टक्के
माढा - ३०.६७ टक्के
बार्शी - ३१.३० टक्के
उत्तर सोलापूर - ३३.७३ टक्के
मोहोळ - ३३.५९ टक्के
पंढरपूर - ३४.४३ टक्के
माळशिरस - ३०.८३ टक्के
सांगोला - ३४.११ टक्के
मंगळवेढा - ३०.८९ टक्के
दक्षिण सोलापूर - ३३.६३ टक्के
अक्कलकोट - ३१.३६ टक्के
एकूण -३२.५२ टक्के