मंगळवेढा आगारातील ३३ बसेस ‘कोरोना फ्री’; प्रवाशांकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:42+5:302021-09-26T04:24:42+5:30
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सर्वांना भीती असताना, एसटी महामंडळाने कोरोना संसर्गापासून बचावासाठी बसला अँटी मायक्रोबियल कोटिंग करण्याचा प्रयोग केला ...
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सर्वांना भीती असताना, एसटी महामंडळाने कोरोना संसर्गापासून बचावासाठी बसला अँटी मायक्रोबियल कोटिंग करण्याचा प्रयोग केला आहे. ज्यात प्रवाशांना कोरोनापासून सुरक्षा मिळणार आहे. मंगळवेढा आगारातील ३३ एसटी बस आतून बाहेरून अँटी मायक्रोबियल कोटिंग केल्या आहेत.
यामुळे व्हायरस, बॅक्टेरिया आणि फंगस पसरत नाही. अर्थात कोरोनाबाधितांमुळे एसटीच्या कोणत्याही भागावर कोरोना विषाणू पसरला तरी तो जिवंत राहू शकणार नाही. असे असले तरी प्रवाशांना बाधित व्यक्तीपासून सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायझर वापरण्यासह सुरक्षित अंतर याबाबत दक्षता घ्यावीच लागणार आहे, अशी माहिती मंगळवेढा आगाराचे सहायक वाहतूक अधीक्षक गुरुनाथ रणे यांनी दिली.
कोटिंगचा प्रभाव दोन महिने
एसटीतील सर्व सीट, हँड रेस्ट, गार्ड रेल, खिडक्या, रेलिंग, चालक केबीन, फ्लोअरिंग, रबर ग्लेझिंग्ज, प्रवासी येण्या-जाण्याचा मार्ग व आतील बाजू, सामान कक्षाची बाहेरील व आतील बाजू याठिकाणी अँटी मायक्रोबियल केमिकल कोटिंग केले आहे. यामुळे जवळपास २ महिने प्रवाशांना सुरक्षा मिळणार आहे. प्रत्येक २ महिन्याला कंपनीकडून कोटिंग केले जाणार आहे. यापूर्वी थेट विमान कंपन्या या तंत्राचा उपयोग करत होत्या, असे आगारप्रमुख मधुरा जाधवर यांनी सांगितले.
कोट ::::::::::::::::::
आगारातील ३३ बसगाड्यांची अँटी मायक्रोबियल कोटिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या बस कोरोनापासून सुरक्षित झाल्या आहेत. एसटीच्या कोणत्याही पृष्ठभागात कोरोनाबाधित व्यक्तीचा स्पर्श झाला तरी विषाणू तत्काळ नष्ट होणार आहे. त्यामुळे इतर प्रवाशांना कोरोनापासून मोठी सुरक्षा मिळणार आहे.
- गुरुनाथ रणे
सहायक वाहतूक अधीक्षक, मंगळवेढा
फोटो ओळी :::::::::::::::::
कोटिंग केलेली बस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाली असता पाहणी करताना गुरुनाथ रणे.