सोलापुरातून ३३ लाखांचा विदेशी दारुचा साठा जप्त; एक्साइज विभागाची मोठी कारवाई
By Appasaheb.patil | Published: February 22, 2023 07:06 PM2023-02-22T19:06:15+5:302023-02-22T19:06:24+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे शेतात बांधलेल्या एका बंगल्यातून गोवा राज्यासाठी विक्रीस असलेला ३२.१९ लाख किंमतीचा विदेशी दारुचा साठा जप्त केला आहे.
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे शेतात बांधलेल्या एका बंगल्यातून गोवा राज्यासाठी विक्रीस असलेला ३२.१९ लाख किंमतीचा विदेशी दारुचा साठा जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, २२ फेब्रुवारी रोजी निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय बातमीच्या आधारे सोलापूर पुणे हायवे रोड ते हिरज रोडच्या उजव्या बाजुस बंदिस्त आरसीसी बंगल्यामध्ये हिरज (ता. उत्तर सोलापूर) याठिकाणी दुपारच्या सुमारास धाड टाकली असता बंगल्यामधील एका कुलुपबंद असलेल्या खोलीत गोवा राज्यात विक्रीस असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला विदेशी दारुचा साठा मिळून आला. या कारवाईत बत्तीस लाख एकोणविस हजार नऊशे वीस किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळी कोणीही मिळून न आल्याने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीने निरिक्षक सदानंद मस्करे पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे, अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सदानंद मस्करे, संभाजी फडतरे, दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, जवान-नि-वाहनचालक रशिद शेख व संजय नवले यांनी पार पाडली.