पंढरपूर विभागात ३३४ कोटींची थकबाकी ; निर्बंध शिथिल, पुन्हा वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:03+5:302021-07-02T04:16:03+5:30
पंढरपूर विभागात मंगळवेढा तालुक्यात घरगुती, कृषी, औद्योगिक, पाणीपुरवठा, पथदिवे आदी मिळून तब्बल ४१ हजार २६२ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ७५ ...
पंढरपूर विभागात मंगळवेढा तालुक्यात घरगुती, कृषी, औद्योगिक, पाणीपुरवठा, पथदिवे आदी मिळून तब्बल ४१ हजार २६२ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ७५ कोटी ८५ लाख ९१ हजार रुपये थकबाकी आहे. पंढरपूर शहरातील सर्व ग्राहकांची संख्या मिळून १५ हजार ६२८ इतकी आहे. त्यांच्याकडे ८१ कोटी ८ लाख ७१ हजार रुपये थकबाकी आहे. पंढरपूर ग्रामीण १ च्या ४४ हजार ३११ ग्राहकांकडे ८९ कोटी ६६ लाख ९ हजार रुपये, पंढरपूर ग्रामीण २ मधील ३८ हजार ५९१ ग्राहकांकडे ७४ कोटी ८८ लाख ५१ हजार तर सांगोला तालुक्यातील सर्व प्रकारच्या ग्राहकांची संख्या ६१ हजार ४४४ इतकी आहे. या ग्राहकांकडे तब्बल ८५ कोटी ५६ लाख २१ हजार रुपयांची थकबाकी गेल्या काही महिन्यांपासून थकीत आहे.
पंढरपूर विभागातील २ लाख १ हजार २३६ ग्राहकांकडे ३३४ कोटी १७ लाख २ हजार रुपयांची थकबाकी आहे. गतवर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत शासनाने सक्तीची वसुली न करता ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन वीज वितरणला केले होते. त्यामुळे थकीत वीजबिलांचा आकडा हजारो कोटींच्या घरात पोहोचला होता. त्यानंतर वीज वितरणने धडक मोहीम राबवत डिसेंबर २०२० अखेर हा आकडा आटोक्यात आणला. मार्चपर्यंत वीज वितरणचे आर्थिक गणित हळूहळू पुन्हा पूर्वपदावर येत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा थैमान घातले. त्यामुळे यावर्षीही वीज वितरणचा थकबाकीचा आकडा पुन्हा शेकडो कोटींच्या घरात पोहोचला आहे.
१५ दिवसांपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्याने वीज वितरणने ही आपली धडक वसुली मोहीम तीव्र करत घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, ग्रामपंचायत पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, शासकीय कार्यालये यांच्याकडूनही सक्तीची वीजबिल वसुली मोहीम सुरू केली आहे. वेळोवेळी आवाहन करूनही जे ग्राहक थकीत वीजबिले भरत नाहीत, त्यांचे वीज कनेक्शन तातडीने तोडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे वसुलीला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी शेकडो कोटींच्या घरात असलेली वीजबिले वसूल करण्यासाठी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
---
४६६ पाणीपुरवठा योजनांचे कनेक्शन तोडले
पंढरपूर विभागात जवळपास ७०० पेक्षा जास्त सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची कनेक्शन आहेत. त्यांच्याकडेही कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही या योजनांची थकीत वीजबिले भरली जात नसल्याने वीज वितरणने धडक कारवाई करत ४६६ पाणीपुरवठा योजनांचे थकीत वीज बिलापोटी वीज कनेक्शन तोडले आहे. याशिवाय घरगुती, औद्योगिक वापराच्या ग्राहकांचीही दररोज शेकडो कनेक्शन कट केले जात आहेत. वीज बिले भरल्यानंतर ही कनेक्शन पुन्हा जोडून दिली जात आहेत. त्यामुळे ग्राहक व वीज वितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये दररोज वादाच्या ठिणग्या पडत असल्या तरी ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांना कोणताही त्रास न देता वीज वितरणने अखंडित वीजपुरवठा करून ग्राहकांना सहकार्य केले. आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे मागील थकबाकी भरून ग्राहकांनी वीज वितरणला सहकार्य करावे. तुम्ही भरलेल्या पैशातूनच वीज वितरण तुम्हांला भविष्यात अखंडित सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्य सरकारनेही तसा जीआर काढत वीजबिले वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आमची वसुलीची मोहीम सुरू राहील.
- एस. आर. गवळी, कार्यकारी अभियंता, वीज वितरण, पंढरपूर विभाग