उजनी धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:00 PM2019-01-19T13:00:04+5:302019-01-19T13:01:19+5:30
सोलापूर : उजनी धरणात शिल्लक असलेला पाण्याचा साठा लक्षात घेता रब्बी हंगामासाठी कालव्याला पाणी सोडण्याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या ...
सोलापूर: उजनी धरणात शिल्लक असलेला पाण्याचा साठा लक्षात घेता रब्बी हंगामासाठी कालव्याला पाणी सोडण्याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. यापूर्वी २० जानेवारीपासून कालव्यातून पाणी सोडण्याच्या झालेल्या निर्णयाप्रमाणे पाणी सोडले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातील पाणी वापराचे नियोजन केले जाते. कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रब्बी हंगामासाठीच्या पाणी पाळीचे नियोजन करण्यात आले होते.
कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार रब्बीसाठी दुसºया पाळीतील पाणी २० जानेवारीपासून सोडण्यात येणार होते. मात्र २० जानेवारीपासून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी उजनी धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. सोलापूर शहरासाठी भीमा नदीला पाणी सोडण्यात आले असून औज-चिंचपूर बंधाºयापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी व आवश्यक पाणीसाठा होईपर्यंत धरणातील पाणी साठा ३० टक्क्यांवर येईल असे अधिकाºयांनी सांगितले.
उजनी धरणातील सध्याची पाणी पातळी व पुढील उन्हाळा लक्षात घेऊन रब्बी हंगामासाठी २० जानेवारीपासून कालव्यातून पाणी सोडण्याऐवजी २० फेब्रुवारी दरम्यान सोडण्याचा प्रस्ताव उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाचा आहे. त्यासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता मिळणे आवश्यक आहे. कालवा सल्लागार समितीच्या मंजुरीशिवाय कालव्यातून पाणी सोडता येत नसल्याने लवकर बैठक घेण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
धरणात १९ टीएमसी पाणी
उजनी धरणात सध्या ८२.५१ टीएमसी असून यामध्ये मृतसाठा ६३.६६ टीएमसी आहे. १८.८५ टीएमसी पाणी उपयुक्त आहे. धरणाच्या पाण्यावर अधिकाधिक ऊस क्षेत्र अवलंबून आहे व कारखान्यासाठी ऊस तोडणी सुरू असल्याने सध्या शेतकºयांकडून पाण्याची मागणीही नाही. यामुळे रब्बी व उन्हाळी अशा एकाचवेळी फेब्रुवारी महिन्यात पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.
पाण्याची शेतकºयांकडून मागणी नाही. धरणात पाणीसाठा लक्षात घेऊन रब्बी व उन्हाळी असे एकाचवेळी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.
- धीरज साळे
अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण