तरटगाव पंपावरून ३५०० लिटर डिझेल पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:22 AM2021-02-13T04:22:17+5:302021-02-13T04:22:17+5:30
कुरुल : सोलापूर - मंगळवेढा महामार्गावरील ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील पेट्रोलपंपावरील सव्वा लाखाच्या डिझेल चोरीच्या प्रकारापाठोपाठ आता तरटगाव (ता.मोहोळ) ...
कुरुल : सोलापूर - मंगळवेढा महामार्गावरील ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील पेट्रोलपंपावरील सव्वा लाखाच्या डिझेल चोरीच्या प्रकारापाठोपाठ आता तरटगाव (ता.मोहोळ) येथील शहा हंसराज जीवन या पेट्रोलपंपावरून २ लाख ९२ हजार ३९० रुपये किमतीचे ३५०० लिटर डिझेल चोरट्यांनी पळविल्याचा प्रकार पुढे आला आहे.
गुरुवारी मध्यरात्री एकनंतर ही घटना घडली. सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेच्या एक दिवस अगोदर याच मार्गावर ब्रम्हपुरी येथील शिवकृपा पेट्रोलपंपावरून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे दीड हजार लिटर डिझेल चोरट्यांनी पळविले. सोलापूर - कोल्हापूर या महामार्गावरील पंपावर डिझेल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पंपचालकांमध्ये खळबळ उडाली.
तरटगाव येथील घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार या पेट्रोलपंपावर श्रीकांत मल्हारी मोटे (रा. शिंगोली ) व मधुकर सोपान मोटे (रा. कामती खुर्द) हे कामगार काम करीत होते. पंपाच्या टाकीत किती डिझेल आहे, हे पाहण्यासाठी तपासणीचे साहित्य घेऊन कामगार टाकीजवळ आले असता त्यांना तिथे डिझेल टाकीला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले.
याबाबत शंका आल्याने त्यांनी डी.पी. राॅड टाकीमध्ये टाकून तपासले असता तीन हजार पाचशे लिटर डिझेल कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पंप व्यवस्थापकांना याची माहिती दिली. याबाबत गायकवाड यांनी कामती पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बबन माने करीत आहेत.