मध्य रेल्वेचे ३५ हजार स्टेशन मास्तर १२ तास उपाशी राहून करणार काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 01:33 PM2020-10-31T13:33:30+5:302020-10-31T13:33:35+5:30
अनोखे आंदोलन; रेल्वेच्या खासगीकरणाला विरोध, विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
सोलापूर : स्टेशन मास्तरांच्या विविध मागण्यांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे़ १२ तास उपाशी राहून स्टेशन मास्तर कामावर कार्यरत राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाचे प्रमुख संजीवकुमार अर्धापुरे यांनी दिली.
नाईट ड्यूटी सीलिंग लिमिट ४३६०० चा आदेश रद्द करावा, ओपल लाईन स्टाफला ५० लाखांचा जीवन विमा देण्यात यावा, रेल्वेचे खासगीकरण आणि निगमीकरण बंद करण्यात यावे, या मागण्यांसाठी स्टेशन मास्तर आंदोलन करणार आहेत.
ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनच्या सोलापूर विभागाचे प्रमुख संजीवकुमार अर्धापुरे यांनी सांगितले की, या मागण्यांविरोधात पहिल्या टप्प्यामध्ये ई-मेलद्वारे रेल्वे बोर्ड अधिकाऱ्यांसमोर विरोध प्रकट केला आहे. दुसऱ्या टप्प्यात १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारत देशातील स्टेशन मास्तरांनी मेणबत्ती पेटवून रात्रपाळी करत लाक्षणिक आंदोलन केले़ तिसऱ्या टप्प्यामध्ये गाडी परिचालन करत करत २० ते २६ ऑक्टोबर पूर्ण एक आठवडा काळी फीत लावून विरोध दर्शविला आहे. यानंतरही प्रशासनाने कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातून रात्रपाळी भत्त्याची कपात केली आहे. त्यामुळे आता चौथ्या टप्प्यात संपूर्ण भारतातील ३५ हजार स्टेशन मास्तर १२ तास संपूर्ण उपोषण करत कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात सर्व स्टेशन मास्तरांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.