३६ दुकानदारांना दिलासा
By admin | Published: July 24, 2014 01:26 AM2014-07-24T01:26:39+5:302014-07-24T01:26:39+5:30
पुणे उपायुक्तांचा निर्णय : रद्द झालेल्या रेशनदुकानांना तूर्त स्थगिती
अक्कलकोट : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रद्द ठरविलेल्या अक्कलकोट तालुक्यातील ४४ पैकी ३६ रेशन दुकानांना पुणे येथील पुरवठा विभागाच्या उपायुक्तांनी २ आॅगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे़ त्यामुळे रेशन दुकानदारांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे़
चार महिन्यांपूर्वी तालुक्यातील मैंदर्गी, दुधनी भागातील तहसील पथकाच्या होम टू होम तपासणीत ४४ रेशन दुकानदार दोषी आढळले होते़ त्या दुकानदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होऊन त्यातील ७ दुकानदारांना क्लीन चिट देण्यात आली होती़ उर्वरित ३६ दुकानांचे परवाने रद्द ठरविले होते़ दरम्यान, तपासणी पथकाच्या अहवालानुसार दक्षिण पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा कलमाखाली फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते़ त्यापैकी २२ दुकानदारांना अटक करून त्यानंतर जामीन मिळाला होता़
या निर्णयानंतर दुकानदारांमध्ये खळबळ उडाली होती़ दरम्यान, विधानपरिषद आमदारांमार्फत यावर स्थगिती मिळविण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती़ त्या ३६ दुकानदारांच्या अर्जावर वकिलामार्फत म्हणणे ऐकून घेऊन १७ जुलै रोजी स्थगितीचा निर्णय दिला़ त्यामध्ये २ आॅगस्टपर्यंत स्थगिती दिली़ या निर्णयामुळे तूर्त तरी दुकानदारांना दिलासा मिळाला आहे़
दुधनी नगरपालिका हद्दीतील रेशन दुकानदारांनी अपिलात नाही गेल्याने ते रद्द ठरविण्यात आले आहे़
---------------------------
पाठिंब्यासाठी जनमत चाचणी
रेशन दुकानदारांमार्फत अॅड़ धायतडक यांनी युक्तिवाद केला़ २ आॅगस्ट रोजी मूळ कागदपत्रांच्या अहवालावरून सुनावणी होणार आहे़ त्याही दिवशी वकिलामार्फत म्हणणे सादर करावे लागणार आहे़
त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित सर्व गावांमध्ये दवंडी देऊन दुकानदारांविषयी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे़
जनमत चाचणीचा अहवाल १६ जुलैपासून स्वीकारण्यात येत आहे. आतापर्यंत २५ नागरिकांचे अर्ज आले आहेत़
---------------------------
रेशन दुकानदार रद्दप्रकरणी स्थगिती आदेशाची प्रत पुणे कार्यालयाकडून मिळाली नाही़ मात्र दुकानदारांकडून मिळाली आहे़ त्यावरून मार्गदर्शनासाठी मंगळवारी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे़ त्या पत्राचे उत्तर आल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे़
- रमेश चव्हाण,
जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर