सांगोला तालुक्यात ३६ हजार जणांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:01+5:302021-06-25T04:17:01+5:30
सरकारने कोरोना संसर्गापासून जनतेला वाचविण्यासाठी कोविशिल्ड लसीकरण मोहीम हाती घेतली. त्यानुसार सांगोला ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ...
सरकारने कोरोना संसर्गापासून जनतेला वाचविण्यासाठी कोविशिल्ड लसीकरण मोहीम हाती घेतली. त्यानुसार सांगोला ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतून १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. या मोहिमेत सरकारने सुरुवातीला शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी व ४४ वर्षांच्या पुढील नागरिकांना लसीकरण सुरू केले.
पहिल्या लाटेत कोरोना संसर्ग झाल्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले, तर दुसऱ्या लाटेत जनतेला संसर्गापासून वाचवण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली. सुरुवातीला नागरिकांनी कोविशिल्ड लस घेण्यासाठी टाळाटाळ केली. नंतर मात्र लसीकरणाचे महत्त्व समजताच नागरिकांनी डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, लसींचा पुरवठा कमी आणि लाभार्थ्यांची संख्या अधिक होत चालल्याने लसीकरण मोहिमेदरम्यान गोंधळ उडाला होता.
त्यानंतर सोलापूर जिल्हा रुग्णालयाकडून कोविशिल्ड लस उपलब्ध होईल त्यानुसार कोविशिल्ड ४७१२ व को-व्हॅक्सिन १४६ उपलब्ध डोसनुसार आतापर्यंत पहिला डोस २८,१३७, तर दुसरा डोस ७३०४ असे ३५ हजार ९४० लाभार्थ्यांना पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण केले आहे. त्यामध्ये शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी (८० हजार ७०८), ३० ते ४४ (४३५), ४५ ते ५९ (९,४८८), शुगर, बिपी आदी आजारातील ४५ ते ४९ (१५४१), ६० वर्षांच्या पुढील (१३,८३१) लाभार्थ्यांना लसीकरण झाले आहे. सध्या सांगोला ग्रामीण रुग्णालयांतर्गत तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमनी यांनी सांगितले.
१८ ते ४४ वयोगटांतर्गत सांगोला ग्रामीण रुग्णालय १३१, अकोला ५२ , जवळा ४४, घेरडी १०५ , महूद १००, नाझरे ९८, कोळा ६५ असे एकूण ५९५ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.