अभ्यासासाठी सोलापूर जिल्ह्यातील ३७८ मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांना दान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:09 PM2018-08-29T12:09:31+5:302018-08-29T12:19:31+5:30
११ जणांचे अवयवदान: देहदानासाठी २५०० जणांची स्वेच्छापत्रे
बाळासाहेब बोचरे
सोलापूर: जिल्ह्यात अवयवदान, देहदान, नेत्रदान या क्षेत्राबद्दल चांगली जनजागृती झाली असून लोक आता रक्तदानाप्रमाणे अवयवदान, नेत्रदान, देहदान यासाठी पुढे येऊ लागले असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ वर्षात ३७८ मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला अभ्यासासाठी दान म्हणून मिळाले असून गेल्या दोन वर्षात ११ जणांनी अवयवदान केले आहे.
ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने केले जाते. सोलापुरात पाच हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची सोय आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले अवयव इतरांचे प्राण वाचवू शकतात हे पटल्याने अवयवदानासाठी लोक तयार होत आहेत. नैसर्गिक मृत्यू आलेल्या निरोगी व्यक्तीचा देह हा वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यासासाठी स्वीकारला जातो.
सोलापुरात डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी येथे ही सोय आहे. या ठिकाणी स्वेच्छापत्रे भरुन घेतली जातात. याशिवाय आठ वर्षांपूर्वी देहांगदान ही संस्था चंदूभाई देढिया यांनी सुरू केली असून, अरुण गोरटे हे सध्या अध्यक्ष आहेत. ही संस्था अवयवदान, देहदान, नेत्रदान, रक्तदान याबाबत जनजागृती करत असून दात्यांची स्वेच्छापत्रेही भरुन घेतली जातात. देहदानाची स्वेच्छापत्रे भरणाºयांची संख्या २५०० च्यावर गेली आहे. गेल्या आठ वर्षात डॉ. वैशंपायन मेडीकलकॉलेजला ३०० जणांनी मृतदेह सुपूर्द केले आहेत. गेल्या दोन वर्षात अश्विनी रुग्णालयाकडे ७८ जणांनी मृतदेह सुपूर्द केले आहेत.
देहदानाने वाढदिवस साजरा
- राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारात वाहक असलेल्या वृषाली राठोड व सुषमा सुरवसे या दोन महिलांपैकी वृषाली यांचा मंगळवार, दि. २८ आॅगस्ट रोजी वाढदिवस होता. त्यादिवशी या दोघींनीही देहांगदान संस्थेत जाऊन देहदान व अवयवदानाची स्वेच्छापत्रे भरून दिली. संस्थेचे अध्यक्ष अरुण गोरटे यांनी त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
आपल्या पतीने देहदानाचा फॉर्म भरला आहे. शिवाय आपल्यानंतर आपल्या देहाचा काहीतरी उपयोग व्हावा, असे वाटले. तसेच आपल्या अवयवामुळे जर कुणाचे प्राण वाचत असतील तर द्यायला काय हरकत आहे, या भावनेने आपण स्वेच्छापत्रे भरली.
-सुषमा सुरवसे, महिला वाहक
अंत्यविधीसाठी होणारा खर्च किंवा निसर्गाचा ºहास आणि प्रदूषण याला आळा बसावा, मृत्यूनंतर आपले अवयव किंवा देह अभ्यासासाठी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने आपण अवयवदान व देहदानास तयार झालो. वाढदिवस असल्याने त्यादिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली एवढेच.
- वृषाली राठोड, महिला वाहक