नाट्य परिषदेच्या १९ जागांसाठी ३८ उमेदवार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:01 PM2018-03-27T13:01:59+5:302018-03-27T13:01:59+5:30
सोलापूरचे चौघे लढतीत कायम, कार्यकारिणीसाठी २१ जण रिंगणात
सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुका लक्षवेधी होत असून, सोलापूरसह काही जिल्ह्यांमध्ये नियामक मंडळाची चुरशीची निवडणूक झाल्यानंतर आता ६ एप्रिल रोजी पदाधिकारी आणि कार्यकारिणीसाठी मतदान होत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १९ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत; तर ११ जणांच्या कार्यकारी समितीसाठी २१ जण लढत देत आहेत.
या निवडणुकीसाठी १४ ते १९ मार्चदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. २० मार्च रोजी अर्जांची छाननी आणि २५ मार्च रोजीची अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आज उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. ६ एप्रिल रोजी मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठानच्या सभागृहात मतदान होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नाट्य परिषदेच्या आठ शाखांच्या वतीने सहकार्यवाह पदासाठी पंढरपूरचे दिलीप कोरके आणि ३ कार्यकारिणी सदस्यपदासाठी उपनगरीय शाखेचे जे. पी. कुलकर्णी, सोलापूर शाखेचे आनंद खरबस आणि सांगोला शाखेचे चेतनसिंह केदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांच्या अंतिम यादीमध्ये जिल्ह्यातील सर्व उमेदवारांची नावे आहेत. सोलापुरातून नियामक मंडळावर वरील चार उमेदवारांसह सोमेश्वर घाणेगावकर (बार्शी), यतिराज वाकळे (मंगळवेढा) हे विजयी झाले होते. हे सहाही जण कार्यकारिणीसाठीच्या मतदानासाठी मुंबईला जाणार आहेत.
नाट्य परिषदेवरील सत्ता काबीज करण्यासाठी माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी आणि नवनाथ कांबळी यांच्या गटांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी होत असून, अध्यक्षपदासाठी ३१ ही मॅजिक फिगर कोण गाठणार? याकडे साºयांचे लक्ष आहे. सोलापुरातील नियामक मंडळाचे सर्वच सदस्य हे मोहन जोशी यांचे समर्थक असून, जोशी पॅनलला ३५ जणांचा पाठिंबा असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
प्रमुख पदांसाठीचे उमेदवार
- - अध्यक्ष (१ जागा) : नवनाथ कांबळी, अमोल कोल्हे
- - उपाध्यक्ष, प्रशासन (१ जागा) : गिरीश ओक, सुनील महाजन
- - उपाध्यक्ष, उपक्रम (१ जागा) : नरेश गडेकर, भाऊसाहेब भोईर
- - कोषाध्यक्ष (१ जागा) : विजय गोखले, जगन्नाथ चितळे, वीणा लोकूर
- - प्रमुख कार्यवाह (१ जागा) : विजय कदम, शरद पोंक्षे
- - सहकार्यवाह (३ जागा) : दिलीप कोरके, सुरेश गायधनीश, सुनील ढगे, सतीश लोटके, दीपा क्षीरसागर