अपघाताचा बनाव करुन विक्री केलेली ४० लाखांची विदेशी दारु नगरमध्ये जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 03:07 PM2022-02-28T15:07:41+5:302022-02-28T15:07:45+5:30
दोघांना अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
सोलापूर : करमाळा तालुक्यातील जातेगाव हद्दीत विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात घडवण्यापूर्वी विक्री केलेली ४० लाखाची दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली असून, दोघांना अटक झाली आहे.
वाहन चालक जहीर रफिक अत्तार (वय ४९, रा. नाशिक), विष्णू मधुकर डमाळे (वय ४२, रा. इमामशाही कोळीवाडा, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हा मद्यसाठा २३ फेब्रुवारी रोजी युनायटेड स्पिलीट लि., पारमोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथून अर्तानी ट्रेडर्ससाठी खरेदी करण्यात आला होता. हा विदेशी मद्यसाठा (क्र. एमएच १५ बीजे ३७३३) मधून करमाळामार्गे सोलापूरला येत होता. २५ फेब्रुवारी रोजी करमाळा तालुक्यातील जातेगाव हद्दीत मालट्रक पलटी करून अपघात घडवून आणला. अपघातानंतर घटनास्थळी एक हजारपैकी ३९८ बॉक्स व पाच बाटल्या सुस्थितीत होत्या. सात बॉक्स फुटलेल्या आवस्थेत आढळून आले. वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. संशय आल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने ५९५ बॉक्स घोडेगाव (ता. नेवसा, जि. अहमदनगर) येथेे ठेवल्याची कबुली दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घोडेगाव येथे जाऊन तपासणी केली असता, दामू जाधव याच्या मालकीच्या पत्राशेडमध्ये ५२७ बॉक्स आढळून आले. ४० लाख ४७ हजार ३६० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्त्वाखाली उपअधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक मुळे, कदम, दुय्यम निरीक्षक अंकुश आवताडे, शंकर पाटील, एस. ए. पाटील, शेख, भरते, सहाय्यक दुय्यम निरीक्षक होळकर, मुंडे व जवान कर्मचारी लुंगसे, कर्चे, वडमिले, सावंत, वाहनचालक मिसाळ, वाघमारे, रशीद शेख यांनी पार पाडली.
फरार झालेल्या दोघांचा शोध सुरू
- ० याप्रकरणी जहीर अत्तार व विष्णू डमाळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकमालक गुलाम महमंद अन्सारी (रा. नाशिक), दामू जाधव (रा. घोडेगाव) हे दोघे फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
- ० अवैध दारू विक्री, निर्मिती, वाहतुकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. असे प्रकार आढळल्यास नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.