नेहरुनगर येथे ४०० मी. च्या धावण मार्गास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:46+5:302021-03-05T04:22:46+5:30
सोलापूर: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत शासकीय मैदान नेहरुनगर, विजापूर रोड येथे अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे आठ ...
सोलापूर: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत शासकीय मैदान नेहरुनगर, विजापूर रोड येथे अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे आठ लेनचे ४०० मी धावण मार्गाचे काम प्रिसिजन फाउंडेशनचे यतीन शहा यांच्या सीआरएस फंडातून करण्यात येत आहे. या कामाचे उद्घाटन स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या हस्ते कुदळ मारुन करण्यात आले. या मैदानावर प्रिसिजनच्या वतीने जुन्या इमारतीचे बळकटीकरण करुन त्यास रंगरंगोटी करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या वतीने मैदानावर खेळाडूंसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वच्छतागृह व मैदानाच्या कडेने दिवाबत्तीची सोय व लॉन इत्यादी कामे नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांच्या प्रयत्नातून करण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय मैदान नेहरूनगर येथे राज्य व राष्ट्रीय स्पर्धा घेणे सोईचे होईल व ॲथलेटिक्स खेळाडूंना त्याचा फायदा होईल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी दिली.
या कामाच्या शुभारंभाच्या प्रसंगी ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार, प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने मोहसीन आत्तार, जॉगर्स क्लबचे अध्यक्ष कांबळे,धनशेट्टी, शाबादे, प्रशांत जामगुंडे, शासकीय मैदान नेहरूनगरचे प्रमुख शासकीय राज्य क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव, मैदान सेवक नागेश सोनटक्के, राष्ट्रीय खेळाडू रवी राठोड, सुनील जाधव, विशाल करजकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सत्येन जाधव, क्रीडा मार्गदर्शक यांनी केले.