उजनी धरणात ४२ टीएमसीचा गाळ, जल आयोगाचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 04:58 PM2018-10-31T16:58:31+5:302018-10-31T17:01:18+5:30
पुणे शहराला दोन वर्षे पाणी पुरेल इतकी जागा व्यापली गाळाने
विशाल शिर्के
पुणे/ सोलापूर : बहुतांश मोठी धरणे अक्षरश: गाळात गेल्याने राज्यातील दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात सर्वाधिक साठवणूक क्षमता असलेल्या सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर बांधलेल्या उजनी धरणांत २०११ सालीच तब्बल २७.९४ टक्के गाळाचे प्रमाण असल्याची माहिती हाती आली आहे. त्यानुसार ३२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी साठविण्याची धरणाची क्षमता कमी झाली आहे. गेल्या सहा वर्षांत गाळ साठण्याचे किमान प्रमाण ग्राह्य धरल्यास हा आकडा ४० ते ४२ टीएमसीवर जाऊ शकतो.
राज्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने राज्यावर दुष्काळाची छाया आहे. राज्यातील दोनशेहून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक पाऊस पडूनही केवळ पावसात सातत्य नसल्याने पिके वाया गेली आहेत. पावसाळ््यात नदी, नाले तसेच ओढ्यांना येणाºया पुरामुळे धरणक्षेत्रात माती, दगड, गोटे, रेती असे अनेक पदार्थ वाहून येतात. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता कमी होते. दर दहा वर्षांनी धरणातील गाळाचा आढावा घेऊन, अतिरिक्तगाळ काढणे अपेक्षित असते. तसे न झाल्याने धरणाची साठवणूक क्षमता कमी होऊन सिंचन क्षमता देखील कमी झाल्याचे वास्तव समोर आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उजनी धरण बांधण्यात आले असून, १९८० साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. या धरणाचे स्वत:चे पाणलोट क्षेत्र नाही. मात्र, जिल्ह्यातील जवळपास १८ धरणांतून सोडलेले पाणी पुढे उजनी धरणात जमा होते. या धरणाची प्रकलपीय क्षमता ३ हजार ३३० दशलक्ष घनमीटर (११७.२७ टीएमसी) आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा ५३.५९ आणि मृत साठ्याचे प्रमाण ६३.६८ टीएमसी आहे. नाशिकच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) २००२ आणि २००७मध्ये गाळाचे सर्वेक्षण करुन दिलेल्या अहवालानुसार उजनी धरणात १२.७७ टक्के इतका गाळ होता. त्यानंतर केंद्रीय जल अयोगाने २०११साली विशेष तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या पाहणीत उजनीतील गाळाचे प्रमाण २७.९४ टक्क्यांवर गेले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार किमान ३२ टीएमसीने धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे.
म्हणजेच २००७ ते २०११ या अवघ्या पाच वर्षांच्या काळात गाळाचे प्रमाण १५.१७ टक्क्यांनी वाढल्याचे निष्पन्न झाले. गेल्या आठ वर्षांत केवळ त्याच्या निम्मा गाळ असल्याचे गृहित धरले तरी टक्केवारी ३५ होईल. तसेच, गाळामुळे ४० ते ४२ टीएमसी इतकी धरणाची पाणी सावणूक क्षमताही कमी होईल. पुणे शहराची पाण्याची गरज पाहता ३२ ते ४२ टीएमसी पाणी शहराला पावणेतीन ते तीन वर्षे पुरेल.