टँकरसाठी ४६ गावांचे प्रस्ताव! अक्कलकोट तालुका: स्वाक्षरीविना अडले घोडे
By admin | Published: May 6, 2014 08:27 PM2014-05-06T20:27:12+5:302014-05-07T00:13:23+5:30
अक्कलकोट: शिवानंद फुलारी
अक्कलकोट:
दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढू लागल्यामुळे तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात वाड्यावस्त्यांसह एकूण १३६ गावे असून यापैकी ४६ गावे तहानलेली आहेत. या गावच्या ग्रामपंचायतींनी मासिक बैठकीत ठराव करुन टँकरसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. यावर तत्काळ निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा अधिकार्याच्या स्वाक्षरीविना घोडे अडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मात्र पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा तालुक्यात पाऊस चांगला झाला तरी उन्हाची तीव्रताही वाढली आहे. तहानलेल्या गावांमधील पाण्याचे स्रोत कमी होऊ लागल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्रसंगावधान ओळखून ४६ गावातील सरपंच, ग्रामसेवकांनी मासिक बैठकीत ठराव करुन पंचायत समितीकडे टँकरसाठी मागणी केली आहे. त्यानुसार संबंधित विभागाचे उपअभियंता संजय धनशेी, शाखा अभियंता निंबाळ, पं. स. चे अशोक झिंगाडे यांनी प्रत्यक्ष पाणीटंचाई असलेल्या गावांना भेटी देऊन तहसीलच्या संबंधित कार्यालयाकडे अहवाल दिला आहे. मात्र अद्याप यावर अधिकार्यांच्या स्वाक्षरीविना घोडे अडले असल्याची माहिती पंचायत समिती सूत्रांकडून मिळाली.
गावांमधील विंधन विहिरी, पाणीपुरवठा विहिरींचे पाणी कमी झाल्यामुळे नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. गतवर्षी मे महिन्यात तालुक्यात १० टँकर सुरु होते तर २६ गावांमध्ये विहिरी अधिग्रहण करुन पाणीप्रश्न सोडविण्यात आला होता. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये तातडीने टँकर पुरविले जावेत, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.
तहानलेली गावे
तालुक्यातील ४६ गावांमध्ये पाणीप्रश्न भेडसावत आहे. यामध्ये बिंजगेर, सदलापूर, दुधनी (ग्रामीण), बबलाद, परमानंदनगर, जेऊर, डोंबरजवळगे, गौडगाव (खु.), खैराट, घुंगरेगाव, वसंतराव नाईकनगर, मिरजगी, आंदेवाडी, बादोला (बु.), ब्यागेहळ्ळी, बणजगोळ, भोसणे लमाणतांडा, बोरी उमरगे, बोरोटी (खु.), चपळगाववाडी, चिक्केहळ्ळी, हालहळ्ळी (म.), हसापूर, हंजगी, इब्राहिमपूर, जेऊरवाडी, कलहिप्परगा, कंठेहळ्ळी, समतानगर, केगाव (बु.), किरनळ्ळी, कोन्हाळी, नागूर, नाविंदगी, निमगाव, शिरसी, बादोले (खु.), तळेवाड, बोरगाव (दे.), दहिटणे-फैलवाडी, गुड्डेवाडी, किणीवाडी, पितापूर, गावठाण, साफळा, सुलतानपूर, संगोगी (म.) आदी तब्बल ४७ गावे तहानलेली आहेत. काही गावांना टँकरची गरज आहे. काही गावात विहीर अधिग्रहण, विहीर दुरुस्ती आदी प्रस्ताव तहसील कार्यालयात पडून आहेत.
---------------------------
दृष्टिक्षेप
एकूण गावे: १३६
लोकसंख्या: २,९०,०३२
टँकरची मागणी : १३
एकाही गावात टँकर चालू नाही
तहानलेली गावे: ४६
पाण्याचे स्रोत: दूरवरून शेतकर्यांच्या विहिरीतून पाण्यासाठी भटकंती
--------------------------
तालुक्यातील ४६ गावांनी केलेल्या मागणीप्रमाणे टँकर मागणीचे प्रस्ताव घेऊन पाणीटंचाईच्या निवारणार्थ मंजुरी मिळविण्यासाठी अक्कलकोट तहसीलकडे पाठविले आहेत. लवकरच त्यावर निर्णय होऊन कार्यवाही होईल.
- संजय धनशेी, उपअभियंता (प्र.) ग्रामीण पाणीपुरवठा, अक्कलकोट