४७ हजार वीज ग्राहकांकडे २१० कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:04+5:302021-06-16T04:30:04+5:30
‘आधी वापरा, मग वीज बिल भरा’ असे असताना अनेक ग्राहक वीज बिल थकवीत आहेत. गतवर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे प्रथम लॉकडाऊन ...
‘आधी वापरा, मग वीज बिल भरा’ असे असताना अनेक ग्राहक वीज बिल थकवीत आहेत. गतवर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे प्रथम लॉकडाऊन झाले. तेव्हापासून काही ग्राहकांनी वीज बिल भरले नाही. वेळेवर वीज बिले न भरल्याने थकबाकीचा डोंगर वाढला आहे. मंगळवेढा तालुक्यांतर्गत मंगळवेढा शहर, मंगळवेढा ग्रामीण, बोराळे, आंधळगाव, मरवडे, निंबोणी अशा सहा शाखा आहेत. या सहा शाखांमध्ये २५ हजार १५० वीज ग्राहकांपैकी १९ हजार ५८६ ग्राहकांनी अद्याप वीज बिल भरले नाही. त्यांच्याकडे ६ कोटी २४ लाख, १८०० पैकी १७३६ व्यापारी ग्राहकांकडे १ कोटी २४ लाख, ८०० पैकी ४०० ग्राहकांकडे ९९ लाख १७ हजार रुपये थकबाकी आहे.
सरकारी कार्यालयाचे १७७ ग्राहक असून, एकाही सरकारी कार्यालयाने वीज बिल भरले नाही. त्यांच्याकडे १९ लाख १० हजार थकबाकी आहे. पाणीपुरवठा १४३ ग्राहक असून, त्यांच्याकडे २ कोटी ५ लाख १५ हजार, शेतीपंपाच्या २१ हजार ९८७ ग्राहकांकडे २०० कोटी रुपयांपर्यंत थकबाकी असून, कृषी संजीवनी योजनेअंतर्गत केवळ २३ कोटी २१ लाख ६८ हजार रुपये भरावे लागणार आहेत, अशी माहिती बिलिंग सेक्शन विभागाचे संतोष खुडे यांनी दिली.
टॉप थकबाकीदारांची पहिल्यांदा वीज कापणार
वीज बिल वसुलीबाबत वायरमनसह अधिकारी वारंवार विनंती करतात. मात्र, त्यांना ते प्रतिसाद देत नाहीत, अशा ग्राहकांची थकबाकी ठेवण्याची सवय मोडावी, या हेतूने टॉप थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचे पहिल्यांदा वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय महावितरणचे संजय शिंदे यांनी घेतला आहे. वीज बिल भरण्याबाबत आडमुठेपणा करणाऱ्या, राजकीय वजन, ओळखीचा गैरवापर करून वीज बिल थकविणाऱ्यांना यामुळे चाप बसणार आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाट कामाला लागला आहे.
सहायक अभियंत्यांना कारवाईच्या नोटिसा
थकीत वीज बिले, वीज चोरी यामुळे डबघाईला आलेल्या महावितरणची गाडी रूळावर आणण्यासाठी उपकार्यकारी अभियंता संजय शिंदे यांनी सहा शाखांमधील सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना वीज बिल वसुली वाढवून वीज चोरी थांबवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा नोटिसीद्वारे दिला आहे. यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, दिवस-रात्र वीज बिल वसुलीची मोहीम सुरू आहे.
कोट ::::::::::::::::
तालुक्यातील वीज बिलांची थकबाकी वाढली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीज बिल वसुलीसाठी आवाहन केले आहे. महावितरण कंपनीने सद्य:परिस्थितीत ग्राहकांना घराबाहेर न पडता ऑनलाईनद्वारे वीज बिल भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ग्राहकांनी आपल्या वीज देयकाच्या ५० टक्के रक्कम वेळेवर भरून सहकार्य करावे, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना केली आहे.
- संजय शिंदे
उपकार्यकारी अभियंता, मंगळवेढा