घराच्या ओढीनं निघाले, 'ते' 978 तरुण; ४८ दिवसांचा हुंदका...चालत्या रेल्वेत विरला...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 03:57 PM2020-05-09T15:57:40+5:302020-05-09T15:57:50+5:30
सोलापूर जिल्ह्यातील परप्रांतीय तामिळनाडूकडे रवाना; खास रेल्वेची व्यवस्था, सोलापूरकरांचे मानले आभार
पंढरपूर : कोरोनामुळेला लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अडकलेल्या तामिळनाडूमधील ९८१ कामगार, मजूर व विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करत खास रेल्वेने तिरुचिरापल्ली या गावाकडे रवाना करण्यात आले.
सोलापूरवरून २२ डब्याची रेल्वे पंढरपूरमध्ये १० वाजता आली आहे. सोलापूरमध्ये या रेल्वे यांचे निर्जंतुकीकरण झाले होते, त्याचबरोबर पंढरपूरमध्ये देखील करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता पंढरपूरमध्ये विविध ठिकाणी ठेवण्यात आलेले तामिळनाडूचे ६१० कामगार मजूर विद्यार्थी रेल्वे स्टेशनवर आणण्यात आले. त्याचबरोबर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, मंद्रूप आदी ठिकाणाहून ३७४ लोकांना पंढरपूरमध्ये आणण्यात आले होते. तामिळनाडूकडे जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यांच्यामध्ये तोरणाची लक्षणे नसल्याने त्यांना गावाकडे जाण्यास परवानगी देण्यात आली. प्रत्येकी माणसी ५६० रुपये तिकीट ठेवण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडे एकूण ५ लाख ४९ हजार ३६० रुपये भरण्यात आले आहे.
एका डब्यामध्ये ८० लोक बसतात. मात्र कोरोनामुळे एका डब्यामध्ये ५४ लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. ही ट्रेन रविवारी दुपारी दोन वाजता तिरुचिरापल्ली या गावामध्ये पोहोचणार आहे.
या सर्व लोकांचे त्या-त्या गावातील प्रशासनाने सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या मदतीने जेवण्याची राहण्याची सोय केली. यांना निरोप देण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, पंढरपूर रेल्वे स्टेशनचे प्रबंधक जे.पी. चनगौड, यातायात निरीक्षक ए. के. श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्रशासनाने उत्तम सोय केली. मागील सहा महिन्यापासून आम्ही पंढरपूरमध्ये राहत होतो. कोरोनामुळे सबंध देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे आम्ही ६१० जण पंढरपुरातच अडकलो परंतु या ठिकाणच्या प्रशासनाने सामाजिक संघटनांनी आमची उत्तम सोय केली आहे. मागील ४८ दिवसापासून आम्हाला दैनंदिन वापराच्या वस्तू नाष्टा दोन टाईम जेवण वेळेवर मिळाले. सर्व प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचे व सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत असल्याचे गौतम राजन (रा. मदुराई, तामिळनाडू) यांनी सांगितले.
तामिळनाडूच्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...
आपल्या गावाकडे जात असल्याचा आनंद प्रत्येक तामिळनाडूच्या नागरिकावर पाहण्यास मिळत होता. त्याचबरोबर या सर्व लोकांना ४८ दिवस व्यवस्थित सांभाळले व त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचतो करण्यात यशस्वी झाल्याचे समाधान देखील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळत होते.
या गावातील एवढे लोक
- मंद्रूप : ४७
- पंढरपूर : ६१०
- माढा : २७
- सोलापूर शहर : १७९
- उत्तर सोलापूर : २८
- उस्मानाबाद : ९०