जिल्ह्यातील आठ ठिकाणी ४८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:21 AM2021-05-01T04:21:07+5:302021-05-01T04:21:07+5:30
देशात व राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून, ग्रामीण भागात तर ऑक्सिजन बेडही उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागातील रुग्णांना ऑक्सिजन मिळवून ...
देशात व राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून, ग्रामीण भागात तर ऑक्सिजन बेडही उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागातील रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी राज्यातील पंचायत समिती सदस्यांनी १५ व्या वित्त आयोगाचा निधी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यास खर्ची घालावा, असे आवाहन आ. रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी केले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेणार असल्याचा निर्णय जाहीर केला.
त्यानंतर आज (शुक्रवार) आ. रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पत्र पाठवून आपल्या सन २०२१- २२ च्या आमदार निधीतील ३८ लाख ४० हजारांचा निधी जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे, जेऊर ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय अकलूज व उपजिल्हा रुग्णालय करमाळा या ८ ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसवण्यासाठी खर्ची घालण्याचे सांगितले आहे.
यामध्ये टेंभुर्णी (ता. माढा, ६ कॉन्सन्ट्रेटर), मोडनिंब (ता. माढा ६ कॉन्सन्ट्रेटर), करकंब (ता. पंढरपूर, ५ कॉन्सन्ट्रेटर), भाळवणी (ता. पंढरपूर, ५ कॉन्सन्ट्रेटर), मेडशिंगी (ता. सांगोला, ६ कॉन्सन्ट्रेटर) याप्रमाणे या ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांत २५ व जेऊर ग्रामीण रुग्णालय ५, उपजिल्हा रुग्णालय, अकलूज १३, करमाळा उपजिल्हा रुग्णालयात ५, असे ४८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आ. रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या निधीतून उपलब्ध होणार आहेत.
कोट
::::::::::::::::::
आपल्या आमदार निधीतून जिल्ह्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जेऊर आणी अकलूज व करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालय, अशा ८ ठिकाणी ४८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसवण्यासाठी ३८ लाख ४० हजारांचा निधी देत आहोत. ऑक्सिजन समस्या सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
-रणजितसिंह मोहिते- पाटील,
विधान परिषद सदस्य