सोलापूरकरांना ४९ लाख लसी टोचल्या; तर १४ हजार नागरिकांनी घेतला बूस्टर डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 06:50 PM2022-01-31T18:50:32+5:302022-01-31T18:50:39+5:30
सोलापूर : वर्षभरात जिल्ह्यात ४९ लाख लसी टोचल्या असून साडेसहा लाख नागरिकांपैकी फक्त १४ हजार ३०२ नागरिकांनी बूस्टर डोस ...
सोलापूर : वर्षभरात जिल्ह्यात ४९ लाख लसी टोचल्या असून साडेसहा लाख नागरिकांपैकी फक्त १४ हजार ३०२ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ३० लाख असून १९ लाख ३७ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. पहिला, दुसरा तसेच बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या ४९ लाख ५७ हजार ५०२ इतकी झाली आहे.
१६ जानेवारी २०२१ रोजी जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या डाेससाठी ३४ लाख १४ हजार नागरिक पात्र असून यापैकी ४ लाख ८६ हजार ६७८ नागरिकांनी अद्याप पहिला डोस घेतलेला नाही. विशेष म्हणजे, दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या ३ लाख २१ हजार ७२४ इतकी आहे.
यासोबत १५ ते १७ वयोगटातील किशोरवयीन मुलांनाही लस टोचली जात असून आतापर्यंत ७५ हजार १९९ किशोरवयीन मुलांना पहिला डोस दिला आहे. बूस्टर डाेसला महिनाभरापूर्वी सुरुवात झाली असून आतापर्यंत १४ हजार ३०२ नागरिकांना बूस्टर डोस मिळाला आहे. हेल्थ वर्कर, फ्रंटलाइन वर्कर तसेच साठ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे. बूस्टर डोससाठी जिल्ह्यातील ६ लाख ६४ हजार नागरिक पात्र आहेत. ५ हजार ९९३ हेल्थवर्कर तसेच ३ हजार ३३१ फ्रंटलाइन वर्कर्सनी बूस्टर डोस घेतला आहे. यासोबत ४ हजार ९८८ ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. बुस्टर डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना आरोग्य कर्मचारी फोन करून बूस्टर डोससाठी बोलावताहेत. बूस्टर डोसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
सात दिवसात ४५ हजार ऊसतोड मजुरांना लस
गाळप हंगाम सुरू झाल्याने परजिल्ह्यातील ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने सोलापुरात येतायेत. ज्या ऊसतोड मजुरांनी लस घेतली आहे, त्यांना काम द्या, अशी सक्ती जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी साखर कारखानदारांची बैठक घेतली. बैठकीनंतर साखर कारखानदार लसीकरण मोहीम राबवायला सुरुवात केली. सात दिवसात ३६ कारखान्यांतील २५ हजार २४६ ऊसतोड मजुरांनी पहिला डोस घेतला असून याच काळात २० हजार ६८९ मजुरांना दुसरा डोस देण्यात आला आहे. असे सात दिवसात एकूण ४५ हजार ९५५ मजुरांना डाेस दिला आहे.