परीक्षा रद्द झाल्याने करमाळ्यातील ४९,८९९ विद्यार्थी पुढच्या वर्गात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:14+5:302021-06-29T04:16:14+5:30
करमाळा : शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील ४९ हजार ८९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा न ...
करमाळा : शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील ४९ हजार ८९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा न देताच पुढच्या वर्गात उडी घेतली आहे. मुलांना अभ्यासाची सवय राहिलेली नसल्याने व यंदा देखील अद्याप शाळा सुरू न झाल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
कोरोनामुळे सर्वात जास्त झळ शिक्षण क्षेत्राला बसली आहे. दीड वर्षापासून प्राथमिक शिक्षण प्रत्यक्ष बंदच आहे. तालुक्यातील १७ केंद्रांअंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक मिळून २८४ शाळांपैकी २२७ जिल्हा परिषदेच्या तर ५७ खाजगी शाळा आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ३१ हजार ३३७ तर खाजगी शाळांमधील १८ हजार ५६२ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये दहावीच्या ७ हजार २५ व बारावीच्या ४ हजार ५३७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा रद्दच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र अभ्यासू विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
----
अभ्यासाची नव्हे मोबाईलची गोडी वाढली
सलग शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय माेडली आहे. अभ्यासाची गोडी कमी झाल्याने पालकांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. त्यात ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाइल आल्याने गेम खेळणे, चित्रपट पाहणे यासह इतर प्रकारांत वाढ झाली आहे.
----
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यात विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण झाल्याने अभ्यास करणार नाहीत. सध्या शाळा बंद असल्याने घरी विद्यार्थी अभ्यास करीतच नाहीत. शिक्षण विभागाने उपाय योजना कराव्यात.
- प्रमोद हिंगसे
पालक