Maharashtra Election 2019; मतदानासाठी आल्या १०९३६ शाईच्या बाटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:52 PM2019-10-16T12:52:11+5:302019-10-16T12:57:01+5:30
सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने मुंबईहून जिल्ह्यात १० हजार ९३६ शाईच्या बाटल्या पाठविल्या आहेत. मतदान केल्याची निशाणी म्हणून जिल्ह्यातील ३४ लाख ३४ हजार ५४९ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत ४२ हजार ३६९ नवीन मतदारांची भर पडली आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. हळूहळू आता प्रचाराचा पाराही चढला आहे. २१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. अवघ्या सात दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपल्याने निवडणूक विभागात लगीनघाई सुरू झाली आहे. मतदानासाठी लागणारी सर्व स्टेशनरी व साहित्य दाखल झाले आहे. ही सर्व स्टेशनरी जिल्ह्यातील ११ निवडणूक निर्णय कार्यालयांकडे पाठविली जात आहे.
मतदान केल्यानंतर मतदारांच्या तर्जनीवर निळी शाई लावण्यात येते. जिल्ह्यात ३५२१ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक बुथवर दोन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. १0 घनसेंटीमीटरच्या बाटलीत ही शाई आहे. एका बाटलीमधून किमान ३५0 मतदारांच्या बोटावर शाई लावता येते. यासाठी मुंबईहून १0 हजार ९३६ शाईच्या बाटल्या आणण्यात आल्या आहेत. या शाईतून जिल्ह्यातील ३४ लाख ३४ हजार ५४९ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. एकदा बोटावर लावण्यात आलेली शाई कमीत कमी महिनाभर पुसली जात नाही. लोकसभा निवडणुकीसाठी ज्यांनी मतदान केले, आता त्यांच्या बोटावरील शाई मिटली आहे. या शाईमुळे बोगस मतदानाला आळा बसला आहे.
बोटावर शाईने आखली जाते उभी रेषा
- २00४ मधील निवडणुकीच्यावेळी मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर निळ्या शाईचा केवळ एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र २00६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी उभी रेषा आखण्याचे निर्देश दिले. तेव्हापासून अर्ध्या नखावर व अर्ध्या बोटाच्या कातडीवर उभी रेषा मारली जात आहे. त्यामुळे आता शाई जास्त लागत आहे.
१९६२ च्या निवडणुकीत पहिल्यांदा शाईचा वापर
- देशात सर्वप्रथम १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात आली होती. तेव्हापासून सर्व निवडणुकीत शाईचा वापर करण्यात येत आहे.
- खास मतदानावेळी वापरण्यात येणारी ही शाई म्हैसूर येथील एका वॉर्निश कंपनीत तयार करण्यात येते. भारतात उत्पादित होणाºया या शाईचा वापर २५ देश त्यांच्या निवडणुकीत करीत असतात.
बाटलीत १0 मिली असते शाई
- एका बाटलीत साधारणपणे १0 मिली निळी शाई असते. ३५0 मतदारांच्या बोटावर एका बाटलीतून शाई लावतात. विधानसभेसाठी ३४ लाख ३४ हजार ५४९ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे.