सोलापुरात ५ दिवसाआड पाणीपुरवठा; 'समांतर जलवाहिनी'साठी दिलीप मानेंचे आंदोलन
By Appasaheb.patil | Published: February 22, 2023 11:58 AM2023-02-22T11:58:18+5:302023-02-22T11:58:46+5:30
माजी आमदार दिलीप माने यांच्या आंदोलनानंतर सोलापूर महानगरपालिका जलवाहिनी कामा संदर्भात काय कार्यवाही करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी कामासंदर्भात सोलापूर महानगरपालिकेकडून कसलीही कार्यवाही न झाल्यामुळे माजी आमदार दिलीप माने यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाला बुधवार २२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली.
सोलापूर शहर विशेषतः हद्दवाढ भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या उजनी-सोलापूर जलवाहिनीचे काम तातडीने सुरू करणे संदर्भात दिलीप माने यांनी ६ फेब्रुवारी रोजी महानगरपालिका आयुक्तांना भेटून चर्चा केली व आठ दिवसात या संदर्भात कार्यवाही न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते, मात्र महानगरपालिकेकडून या कामासंदर्भात कसलीही कार्यवाही व अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे बुधवारी सकाळपासून आंदोलनास सुरूवात केली. या आंदोलनात सकाळच्या सत्रात शेकडो सोलापूर व दिलीप माने समर्थकांची उपस्थिती होती. हळूहळू आंदोलनस्थळावर गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या आंदोलनानंतर सोलापूर महानगरपालिका जलवाहिनी कामा संदर्भात काय कार्यवाही करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.
या आंदोलनात माजी स्थायी समिती सभापती केदार उंबरजे, जयकुमार माने, पृथ्वीराज माने, आप्पासाहेब काळे, गंगाधर बिराजदार, युवा मंचचे सुनिल जाधव, आप्पासाहेब कदम, संभाजी भडकुंबे, अनिल वाघमारे, समीउल्ला शेख, अजय सोनटक्के, सचिन चौधरी, शैलजा राठोड, महेश घाडगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.