मागेल त्याला वीज कनेक्शन; बारामती परिमंडलात ५ वर्षांत ५ लाख विक्रमी वीज जोडण्या
By Appasaheb.patil | Published: January 23, 2024 05:07 PM2024-01-23T17:07:36+5:302024-01-23T17:07:52+5:30
परिणामी महावितरणच्या महसूलात घसघशीत वाढ झाली आहे.
सोलापूर : एप्रिल २०१९ ते डिसेंबर २०२३ या जवळपास पाच वर्षांच्या कालावधीमध्ये महावितरण बारामती परिमंडलाने तब्बल ५ लाख २ हजार ९१६ इतक्या विक्रमी वीज जोडण्या देण्याचे काम केले आहे. यात कृषीच्या १ लाख ९ हजार ७२ वीजजोडण्यांचा समावेश आहे. परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक दिवस, एक गाव’, ‘मागेल त्याला कनेक्शन’ अशा विविध मोहिमा वेळोवेळी व यशस्वीपणे राबविल्याने हे उत्तुंग यश साध्य झाले आहे. परिणामी महावितरणच्या महसूलात घसघशीत वाढ झाली आहे.
बारामती परिमंडलात पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, पुरंदर व भोर तालुके तर सातारा व सोलापूर हे जिल्हे येतात. गावागावात कॅम्प लावून वीज जोडण्या दिल्या. ३१ मार्च २०१९ अखेरीस परिमंडलाची ग्राहक संख्या सुमारे २४ लाख ८९ हजार ९४२ इतकी होती. डिसेंबर २०२३ अखेरीस ग्राहक संख्येत २० टक्के वाढ झाली. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ९९ हजार ४३३, २०२०-२१ मध्ये ७१ हजार ६०१, २०२१-२२ मध्ये १ लाख १३ हजार ५३७, वर्ष २०२२-२३ मध्ये १ लाख २५ हजार ९५२ तर चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये डिसेंबर अखेर ९२ हजार ३९३ अशा एकूण ५ लाख २ हजार ९१६ वीज जोडण्या देण्याचे काम झाले आहे. यामध्ये कृषीच्या १ लाख ९ हजार ७२ तर बिगरशेतीच्या ३ लाख ९३ हजार ८४४ वीजजोडण्यांचा समावेश आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या विहीरीचे किंवा बोअरवेलचे अंतर महावितरणच्या अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेपासून ३० मीटरच्या आत आहे, त्यांना २४ तासात कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. या अंतरातील प्रलंबित वीज जोडण्यांची संख्या शून्यावर आहे. नव्याने ज्यांना ३० मीटरच्या आतील जोडणी हवी असेल त्या शेतकऱ्यांनी स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावा. ३० मीटर ते २०० मीटर अंतरावर जोडणी देण्याचे कामही निधीनुसार केले जात असल्याचे महावितरणने सांगितले.