सोलापुरातील एलईडीचे ७० टक्के काम पूर्ण, बंद दिवे बदलण्यात हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:21 PM2019-07-23T13:21:39+5:302019-07-23T13:24:20+5:30

महापालिकेतील नगरसेवकांचा आरोप; आयुक्तांनी स्वतंत्र बैठक घेण्याची अन् एक महिना मुदतवाढीची मागणी

5% of LED's in Solapur complete, refuse to switch off lights | सोलापुरातील एलईडीचे ७० टक्के काम पूर्ण, बंद दिवे बदलण्यात हलगर्जीपणा

सोलापुरातील एलईडीचे ७० टक्के काम पूर्ण, बंद दिवे बदलण्यात हलगर्जीपणा

Next
ठळक मुद्दे१५ जुलैअखेर शहर आणि हद्दवाढ भागात २६ हजार ४६० एलईडी बल्ब बसविण्यात आले स्मार्ट सिटी कंपनीकडून शहर आणि हद्दवाढ भागात आवश्यक त्या ठिकाणी नवीन विद्युत पोल आणि विजेच्या तारा जोडण्याचे काम होणारएलईडीच्या कामाबाबत आणि प्रकाशाबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून तक्रारी केल्या जात आहेत

सोलापूर : महापालिका आणि एनर्जी एफिशिएन्शी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) कंपनीच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांवर एलईडी बल्व बसविण्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाची मुदत संपली असून ईईएसएल कंपनीने पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. नव्याने बसविलेले एलईडी बल्ब बंद पडले आहेत. हे दिवे बदलण्यात कंपनीकडून हलगर्जीपणा केला जात असून मनपा आयुक्तांनी या विषयावर स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. 

शहरातील ४० हजार पथदिव्यांवरील जुने दिवे बदलून एलईडी बल्ब बसविण्याचे काम डिसेंबर महिन्यात सुरू झाले होते. मनपाच्या विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलैअखेर शहर आणि हद्दवाढ भागात २६ हजार ४६० एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. ईईएसएल कंपनीने यापूर्वी मुदतवाढ मागितली होती. १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. कंपनीने पुन्हा मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. 

स्मार्ट सिटी कंपनीकडून शहर आणि हद्दवाढ भागात आवश्यक त्या ठिकाणी नवीन विद्युत पोल आणि विजेच्या तारा जोडण्याचे काम होणार आहे. अशा पाच हजार पोलवर एलईडी बल्ब बसविण्यात येतील. पुढील दोन महिन्यात तक्रार निवारण केंद्र उभारण्यात येईल. नागरिक या केंद्रात फोन करुन तक्रार नोंदवू शकतील. 

दरम्यान, एलईडीच्या कामाबाबत आणि प्रकाशाबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. एलईडी बंद पडल्यानंतर विद्युत विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींची दखल घेतली जाते. पण नवे बल्ब अद्याप बसविण्यात आलेले नाहीत, असेही नगरसेवकांचे म्हणणे आहे. 

वीज बिलात ५० लाख रुपयांची बचत 
- जानेवारी महिन्यात महापालिकेच्या पथदिव्यांचे वीज बिल एक कोटी ४७ लाख ७५ हजार १८० रुपये आले होते. जून महिन्यात एक कोटी आठ लाख ५९ हजार ६६९ रुपये आले आहे. जून महिन्याच्या वीज बिलात जवळपास ३९ लाख रुपयांची बचत झाली आहे. जुलै महिन्यात यात वाढ होऊन जवळपास ५० लाख रुपयांची बचत होईल, असा दावा विद्युत विभागातील अधिकाºयांनी केला. 

एलईडी बसविण्याचे काम संथगतीने सुरू आहे. मनपासोबत झालेल्या करारानुसार, ईईएसएल कंपनी फिलिप्स कंपनीचे एलईडी बल्ब बसविणार होती. पण सध्या साध्या कंपनीने बल्ब बसविले जात आहेत. हे बल्ब ८ ते १५ दिवसांत बंद पडतात. त्यामुळे कंपनीकडून होणाºया या कामाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांकडून करण्यात येणार आहे. एलईडी बसविणार म्हणून प्रभागातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम बंद आहे. हद्दवाढ भागात आजही अंधार आहे. महापालिका आयुक्तांनी या विषयांवर स्वतंत्र बैठक घ्यायला हवी, अशी मागणी आम्ही करणार आहोत. 
- नागेश वल्याळ, नगरसेवक, भाजप. 

काही भागात बल्ब बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत. एलईडी बल्बच्या देखभाल दुरुस्तीचे काम ईईएसएल कंपनी पुढील सात वर्षे करणार आहे. कंपनी प्रतिनिधींना याची माहिती देऊन बल्ब बदलून घेतले जात आहेत. त्याच्या नोंदीही ठेवल्या जात आहेत.
- राजेश परदेशी, 
सहायक अभियंता, विद्युत विभाग, मनपा. 

Web Title: 5% of LED's in Solapur complete, refuse to switch off lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.