पंढरीच्या स्वच्छतेसाठी ५ हजार ७८२ शौचालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:24 PM2019-07-09T13:24:42+5:302019-07-09T13:26:36+5:30
आषाढी यात्रेतील सोय : भाविकांचे आरोग्य सुरक्षित
सचिन कांबळे
पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरीत दाखल होणारे अनेक भाविक उघड्यावर शौचास जातात़ त्यामुळे जर तात्पुरत्या किंवा फिरत्या शौचालयाची सोय केली तर भाविक त्याचा लाभ घेऊ शकतील़ परिणामी शहर व परिसरात दुर्गंधी सुटणार नाही़ प्रशासनाने ५ हजार ७८२ शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.
आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री या यात्रांमध्ये व महिन्याच्या एकादशीसाठी पंढरपुरात लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांना योग्य ती सोय नसल्याने ते उघड्यावर शौचास बसतात. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर येतो. तसेच अनेकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. यामुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शहराच्या विविध भागात शौचालय बांधणी केली आहे.
दर्शनासाठी आलेले भाविक दर्शन रांगेत थांबतात. त्यामुळे सर्वाधिक गर्दी हिंदू स्मशानभूमीशेजारील पत्राशेड व तात्पुरत्या शेडमध्ये असते. यामुळे त्या ठिकाणी १२६ सीटची शौचालये बांधण्यात आली आहेत. त्याचबरोबर पत्राशेड परिसरात देखील तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये उभारण्यात आली आहेत. तसेच भक्तिमार्ग परिसरात जादा मठांची संख्या आहे. यामुळे गजानन मठाच्या मागच्या बाजूला स्वच्छतागृह बांधले आहे. चंद्रभागा नदीच्या घाटाजवळील लाड मठासमोरही स्वच्छतागृहे बांधण्यात येत आहेत. तसेच चंद्रभागा नदीच्या घाटावरही तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये उभारण्यात आली आहेत.
अशा मिळणार सुविधा
- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून बांधलेल्या सुलभ शौचालयाच्या इमारतीमध्ये १२६ शौचालयाचे सीट, ११ ठिकाणी लघुशंका करण्याची सोय, २६ स्नानगृह, ३ क्लॉक रूम (साहित्य ठेवण्याची खोली), पार्किंग या सर्व इमारतीची देखभाल करणाºया लोकांसाठी १ खोली, पाणी साठवण्यासाठी १ लाख लिटरची भुयारी पाण्याची टाकी, २ मोटारपंप अशा सुविधा सुलभ शौचालयाच्या इमारतीत असल्याची माहिती सुलभ इंटरनॅशनल कंपनीचे आर. एन. झा यांनी दिली.
विभागनिहाय उभारणी
- शहरात नगरपरिषदेचे २०९, सार्वजनिक बांधकाम विभागाचे १८६४, तात्पुरत्या स्वरूपाचे १५००, रेल्वे स्टेशन आणि अंबाबाई मंदिर पिछाडीस बंधाºयाच्यावर, विस्थापित नगर, कुंभार घाट या ठिकाणी फिरत्या शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे़