पंढरपूर तालुक्यातील ५० सिमेंट बंधारे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:41+5:302021-04-30T04:27:41+5:30
पंढरपूर : मागील वर्षीच्या अतिवृष्टीत उपरी, वाखरी, गादेगाव, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील ओढ्यांना पूर आला. या पूरस्थितीत तालुक्यातील जवळपास ...
पंढरपूर : मागील वर्षीच्या अतिवृष्टीत उपरी, वाखरी, गादेगाव, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील ओढ्यांना पूर आला. या पूरस्थितीत तालुक्यातील जवळपास ५० सिमेंट बंधारे फुटून वाहून गेले. त्यात बंधाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता दुसरा पावसाळा आला तरी हे बंधारे निधीअभावी अद्याप ही दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
काही ठिकाणी रस्त्यांच्या समस्या उद्भवल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी स्वखर्चातून मुरूम, माती टाकून फुटलेले भरावा बंदिस्त करून रस्ते सुरू केले आहेत. मात्र, त्यामध्ये पाणी आडविणे, साठविणे अवघड आहे. पावसाळ्यापूर्वी या बंधाऱ्यांची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
मागील वर्षी पंढरपूर, सांगोला तालुक्यात मागील २० वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली होती. काही परिसरात मोठी अतिवृष्टी झाल्याने ३० ते ४० वर्षांत कधीही न वाहिलेल्या उपरी येथील कासाळगंगा, बोहाळी रानुबाई, वाखरी, गारडी, पळशी, सुपली, गादेगाव, आदी ओढ्यांना मोठा पूर आला. या पुराचे पाणी ओढ्यांच्या पात्रात न बसल्याने ते शेजारील सुपीक जमिनीमध्ये शिरले. परिणामत: पिके, घरे, जनावरे, विजेचे खांब, रोहित्रे, वाहनांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर त्यांची दुरुस्ती झालीच नाही.
---
यंदा एकाही बंधाऱ्याचे पाणी अडवता आले नाही
प्रत्येक वर्षी उन्हाळी हंगामात उजनी, नीरा उजवा कालवा, सोनके तलावातून शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर या ओढ्यांमधील काही बंधाऱ्यांमध्ये पाणी आढविले जाते. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरी, बोअर, हातपंप, यांची पाणी पातळी वाढून परिसरातील शेतकरी, नागरिकांना त्याचा मोठा फायदा होतो. मात्र, बंधारे फुटल्यामुळे यावर्षी उन्हाळी हंगामात एकाही बंधाऱ्यामध्ये पाणी अडविता आले नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. हक्काचे पाणी वाहून गेले, विहिरी बोअर पाणी पातळी ही वाढली नाही.
---
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निधीची घोषणा हवेत
दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार प्रशांत परिचारक, आमदार संजय शिंदे यांची महत्त्वाची बैठक पुण्यात झाली होती. त्या बैठकीनंतर निधी उपलब्ध झाल्याची घोषणा ही प्रशांत परिचारक यांनी केली होती. मात्र, प्रत्यक्षात ना निधी मिळाला, ना दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली.
----
अतिवृष्टीमुळे जवळपास २८ बंधाऱ्यांचे नुकसान झाले होते. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मात्र, अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेता आले नाही. हे सर्व बंधारे पाटबंधारे विभागाकडे वर्ग करून दुरूस्त करावेत, असे पत्र ही देण्यात आले होते.
- पी. एम. आगावणे, प्रभारी उपअभियंता जिल्हा परिषद जलसंधारण पंढरपूर विभाग.
--२९ वाखरी
वाखरी येथील ओढ्यावरील सिमेंट बंधाऱ्याचे मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान दिसत आहे. अशी बिकट अवस्था बहुतांश बंधाऱ्यांची झाली आहे.