प्रवासाचे ५० लाख प्रशासनाच्या खात्यावर; मजूर मात्र रस्त्यावरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:13 AM2020-05-15T11:13:07+5:302020-05-15T11:15:22+5:30
सोलापुरात नियोजनाचा अभाव; लॉकडाऊनच्या काळात लोकांचे हाल कायम
सोलापूर : परप्रांतातील मजुरांच्या प्रवास सेवेसाठी राज्य शासनाने ५० लाख रुपये जिल्हा प्रशासनाच्या खात्यावर पाठवले आहेत; मात्र अजूनही शेकडो मजूर स्वखर्चाने गावी जात आहेत किंवा पायीच निघाले आहेत. अधिकारी बैठकांमध्ये व्यस्त आणि लोक त्रस्त अशी अवस्था झाली आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मजूर आणि सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत. या आठवड्यात मजुरांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयांकडे निधी पाठवला आहे. पण तो व्यवस्थित वापरात येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन अनेक मजूर गावी पायी निघाल्याचे पाहायला मिळाले. झारखंडचे प्रदीप कुमार आणि त्यांचे कुटुंबीय सोरेगाव येथून पायी निघाले होते. दोनवेळा रेल्वे स्टेशनकडे पायी जाऊन आलो. इथे गेले की आम्हाला काही माहीत नाही म्हणून सांगतात. आम्ही किती दिवस वाट बघायची. आम्हाला इथे खायला काही नाही. आम्ही थांबणार नाही म्हणत ते चालत राहिले.
सात रस्ता येथील रस्त्यावर झारखंड येथील सात ते आठ तरुण झोपले होते. हे तरुण एनटीपीसीच्या परिसरात राहायला असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे तर सुरू झाली नाही. पण सोलापुरातून एखादी बस करुन गावी जाऊ. गावी जाण्यासाठी खर्च करण्याची तयारी असल्याचे या तरुणांनी सांगितले.
गुरुवारी सायंकाळी तुळजापूर रोडने अनेक मजूर आपल्या कुटुंबासह पायी निघाल्याचे चित्र दिसत होते. पायी जाणाºया मजुरांना विश्वास देणारा एकही अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर दिसून आला नाही.
अधिकाºयांचे लक्ष केवळ निवारा केंद्रांकडे
- महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये केवळ दोन ते अडीच हजार लोक होते. त्याहून अधिक लोक शहराच्या गल्ली, मोहल्ल्यांमध्ये अडकून पडले आहेत. या लोकांपर्यंत जिल्हाधिकारी, महापालिका कार्यालयातील अधिकारी पोहोचले नाहीत. महापालिकेच्या निवारा केंद्रात थांबलेल्या तामिळनाडूच्या नागरिकांसाठी सोलापुरातून रेल्वे सोडण्यात आली. उर्वरित राज्यातील नागरिक स्वखर्चाने गावी निघाले आहेत. उत्तरप्रदेशमधील मजुरांनी प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन गाव गाठले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या बैठकांचे सत्र असते. या बैठकातून वरिष्ठ अधिकाºयांना वेळ मिळत नाही आणि कर्मचारी मात्र या गोष्टींकडे लक्ष देत नसल्याचे पाहायला मिळते.
उत्तरप्रदेश, बिहार राज्यात जाणाºयांसाठी सोलापुरातून रेल्वे सोडण्यात येत आहेत. लोकांनी चालत जाऊ नये म्हणून आम्ही आवाहन करतोय. पण लोक ऐकायला तयार नाहीत. परराज्यातील लोकांना एसटीने मोफत त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याची आमची तयारी आहे. त्यादृष्टीने नियोजन करीत आहेत. लोकांनी चालत जाऊ नये असे आवाहन यापूर्वी केले आहे. आताही करीत आहोत.
-संजीव जाधव,
अपर जिल्हाधिकारी, सोलापूर.