होटगी रोड ईदगाह मैदानावर ५० हजार बांधवांची नमाज अदा
By काशिनाथ वाघमारे | Published: April 22, 2023 12:25 PM2023-04-22T12:25:32+5:302023-04-22T12:25:49+5:30
नमाज पठणासाठी जिल्हा सत्र न्यायधीश शब्बीर औटी हे ही उपस्थित राहिले.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: रमजान ईद निमित्त होटगी रोड ईदगाह मैदानावर शनिवारी सकाळी सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली. जवळपास ५० हजार बांधवांनी यावेळी हजेरी लावली. पोलीसांच्या हस्ते गुलाब फुलं देऊन या बांधवांचे स्वागत करण्यात आले.
होटगी रोड ईदगाह मैदानावर शनिवारी सकाळी ७.४५ वाजल्यापासून गर्दी होऊ लागली. शहर काझी मुफ्ती अमजदअली काझी यांच्या उपस्थित नमाज पठण झाले. यावेळी काही ज्येष्ठ मंडळींनी उन्हापासून संरक्षणार्थ छत्री घेऊन हजेरी लावली. होटगी रोड ईदगाह मैदानावर जवळपास ३० हजार बांधव आणि मैदानांच्या बाजुला असलेल्या डांबरी रस्त्यावर, मुख्य रस्त्यांवर जवळपास २० हजार बांधव नमाज अदा केली. नमाज पठणासाठी जिल्हा सत्र न्यायधीश शब्बीर औटी हे ही उपस्थित राहिले.
प्रारंभी पोलीस आयुक्त राजेंद्रम माने यांनी या मैदानावर येऊन औटी आणि शहर काझी यांना भेटून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नमाज पठण झाले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही होता. नमाज पठणानंतर उपस्थित बांधवांनी एकमेकांना हस्तांदोलन करीत शुभेच्छा दिल्या.
चिमुकल्यांच्या ड्रेसकोडने वेधले लक्ष...
यावेळी काही लहान मुले आणि तरुणांचे ड्रेसकाेडमध्ये मैदानावर आगमन झाले. मोहमद मुस्तफा, मोहमद नवाज, मोहमद मोईद्दीन, मोहमद गुलामअली या चिमुकल्यांनी पांढरा जाकेट आणि शेरवानी परिधान करुन सा-यांचे लक्ष वेधले.