सोलापूरमध्ये धाड घालून ५० हजार लिटर हातभट्टी दारू केली नष्ट
By Admin | Published: October 5, 2016 02:47 PM2016-10-05T14:47:11+5:302016-10-05T14:47:11+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अवैध धंद्यावर धाड टाकून ५० हजार लिटर दारू नष्ट केली.
>आप्पासाहेब पाटील, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.५ - राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सोलापूर तालुका पोलीस ठाणे व अन्य विभागाच्या मदतीने बुधवार ५ आॅक्टोबर रोजी मुळेगांव, बक्षीहिप्परगा (ता़द़सोलापूर) येथील अवैध धंद्यावर धाड टाकून २४९ बॅरेलमधील ५० हजार लिटर दारू तयार करण्यासाठीचे रसायन नष्ट करून १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ही कारवाई पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण भोसले व सहा़ पोलीस निरीक्षक विकास आडसुळ यांनी दिली़
दरम्यान, बुधवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्यासह अन्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी मुळेगांव तसेच बक्षीहिप्परगा तांड्यावर अचानक धाड टाकून दारू अड्डे उध्वस्त केले़ यात गुळ मिश्रित रसायन, प्लास्टिक टाक्या, बॅरेल असे साहित्यही नष्ट केले़ ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख सागर धोमकर व पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण भोसले, सहा़ पोलीस निरीक्षक विकास आडसुळ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे, पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह होमगार्ड, पोलीस कर्मचाºयांनी केली़
या कारवाई दरम्यान पोलिसांनी तीन जेसीपी यंत्रांच्या सहाय्याने हातभट्टी तयार करणारा गूळ, रसायन आणि इतर साहित्य ठेवलेले पिंप नष्ट केले. काही ठिकाणी जमिनीत व पिकांमध्ये तसेच विहिरीत दारूचा साठा दडवून ठेवण्यात आला होता याचाही शोध पोलीसांनी घेतला़ हातभट्टी दारू तयार करण्यासाठी महावितरण कंपनीच्या विद्युत तारांवर चक्क आकडे टाकून तर काही ठिकाणी बेकायदेशीर विद्युत जोडणी करून विजेचा वापर केला जात होता. महावितरणच्या पथकाने ही वीज जोडणी तोडून टाकल्याची माहिती समोर आली आहे़ शिवाय या हातभट्टी दारू निर्मिती कारखाने चालविणारे व त्यासाठी स्वत:च्या जागा उपलब्ध करून देणाºयांचा शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर शहर व जिल्ह्यातील अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत़ मुळेगांव व बक्षीहिप्परगा तांड्यावर यापूवीर्ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली़