रेल्वेत मास्क नसेल तर ५०० दंड पण लसीकरण प्रमाणपत्राची विचारणा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 06:10 PM2022-01-14T18:10:25+5:302022-01-14T18:10:31+5:30
पथके नियुक्त; लसीकरण प्रमाणपत्राची विचारणा मात्र नाहीच..
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : कोरोना व्हायरसचा नवा संसर्ग वेगाने वाढत असून, पुन्हा विविध निर्बंध घातले जात आहेत. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी प्रवाशांवर विविध निर्बंध लादले आहेत. याबाबत गुरुवारी सोलापूररेल्वेस्थानकाचा रिॲलिटी चेक केला असता प्रवाशांना स्थानकावर रेल्वे अधिकाऱ्यांकडून तिकिटाची विचारणा केली जात होती. मास्क नसलेल्या प्रवाशांना ५०० दंड आकारण्यात येत होते; मात्र लसीकरण प्रमाणपत्राची विचारणा होत नसल्याचे चित्र दिसले.
वेगाने पसरत असलेला कोरोनाचा संसर्ग आणि कोविडचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे सरकारने राज्यात अनेक निर्बंध लादले आहेत. केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या नव्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सर्वच स्टेशनवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यात येत आहे. मास्क घालण्याविषयी जनजागृती, प्रचार व प्रसार केला जात आहे. शिवाय स्थानकावर विविध ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे यासाठी डिजिटल फलक लावण्यात आले आहेत.
----------
प्रवासावेळी दोन डोस प्रमाणपत्राची विचारणा..
रेल्वे प्रवासावेळी तिकीट तपासणी अधिकारी (टीसी) याच्याकडून प्रवाशांना तिकीट तपासणीवेळी दोन डोस घेतलेल्या प्रमाणपत्राची विचारणा केली जात आहे. शिवाय मास्क न घातलेल्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
----------
लोहमार्ग, आरपीएफ पोलिसांची मदत...
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलीस अधिकारी व कर्मचारीही लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक स्थानकावर व रेल्वे प्रवासावेळी विनामास्क प्रवाशांवर पोलिसांकडूनही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
----------
आरक्षण केंद्रात गर्दी..
आरक्षण केंद्रात तिकीट खिडकीवर तिकीट काढताना तिकीट काढणाऱ्या प्रवाशाला दोन डोस घेतलेले आहे की नाही याबाबत विचारणा केली जात नाही. आरक्षण केंद्रात फिजिकल डिस्टन्सिंगनचे पालन होताना दिसत नाही. नियम पाळा असे सांगणारेही कोणी रेल्वे अधिकारी या केंद्रात दिसून येत नाहीत.
------------
सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्या...
- सिद्धेश्वर एक्स्प्रेस
- हुतात्मा एक्स्प्रेस
- नागरकोईल एक्स्प्रेस
- कोणार्क एक्स्प्रेस
- उद्यान एक्स्प्रेस
- विशाखापट्टणम एक्स्प्रेस
- कर्नाटक एक्स्प्रेस
- गदग एक्स्प्रेस
----------
रेल्वे प्रवाशांना कोरोनासंदर्भात असणाऱ्या नियमावलीचे पालन करावे लागेल. जर कोणी प्रवासी नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मास्क न घातलेल्या प्रवाशांकडून ५०० दंड आकारण्यात येत आहे. शिवाय कोरोनामुळे स्थानकावर स्वच्छतेला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल व्यवस्थापक, सोलापूर मंडल