कुंभारीच्या माळरानावर तयार होते दररोज ५०० लिटर विषारी ताडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:56 PM2020-09-29T12:56:49+5:302020-09-29T12:58:29+5:30
माफियांचा सुळसुळाट; पहाटे चार ते सहादरम्यान शहराच्या विविध भागांत वितरण
सोलापूर : समाजसेवेची शाल पांघरलेला ‘प्रहार’ प्रतिनिधी कुंभारीच्या माळरानावर विषारी ताडी तयार करतोय. बेकायदा विषारी ताडीचा काळा धंदा सध्या जोरात असून, कुंभारीच्या एका शेतात दररोज बनणारी ५०० लिटर ताडी पहाटे चार ते सहादरम्यान वितरित होते. यात मोठी यंत्रणा गुपचूपपणे काम करते. हे सर्व पोलिसांच्या वरदहस्ताने चालते, अशी माहिती गोदुताई विडी घरकूल परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली.
गोदुताई विडी घरकूल परिसरात ताडीची निर्मिती करणाºया एका कथित पुढाºयाने दोन ते तीन घरे भाड्याने घेतली आहेत. या खोल्यांमध्ये तो ताडी निर्मितीचे साहित्य ठेवतो. मध्यरात्रीनंतर त्याची ताडी निर्मिती प्रक्रिया सुरू होते. अशीच काहीशी प्रक्रिया शहराच्या विविध भागात चालते.
सोलापुरात अधिकृत ताडी विक्री केंद्रांना बंदी आहे. त्यामुळे गल्लोगल्ली क्लोरल हायड्रेट मिश्रित विषारी ताडीची विक्री जोरात सुरू आहे. क्लोरल हायड्रेट ही विषारी पावडर परप्रांतातून आणली जाते. याचे धागेदोरे कर्नाटक ते आंध्रप्रदेशापर्यंत विणले गेले आहेत. सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विषारी ताडीची विक्री सुरू आहे. विशेष करून गोदुताई विडी घरकूल येथील ‘अ’ गट परिसरात ताडी विक्री होते. यासोबत जुनी विडी घरकूल परिसर, नीलमनगर, अशोक चौक, सत्तर फूट रोड परिसर, गेंट्याल चौक, बापूजीनगर, कन्ना चौक, घोंगडे वस्ती, भवानीपेठ या परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी ताडीची विक्री सुरू आहे.
पोलीस यंत्रणेचा पूर्ण सहभाग : आडम
अधिक माहिती देताना माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले, कुंभारी येथील गोदुताई विडी घरकूल परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी ताडीची निर्मिती होते. विषारी ताडीविरोधात ‘डीएसपीं’कडे तब्बल चाळीस वेळा तक्रार केली. पाच वेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गांधी जयंतीदिनी ताडी गुत्त्यावर बहिष्कार टाकला, तरी घरगुती ताडी विक्री केंद्रे सुरू आहेत. आम्ही ज्यावेळी पोलिसांकडे तक्रार करतो, फक्त त्याच वेळी कारवाई होते. इतर वेळेला पुन्हा पोलिसांच्या वरदहस्ताने ताडी विक्री जोरात चालते. यात शंभर टक्के पोलीस यंत्रणेचा सहभाग आहे. पोलिसांना हप्ते जातात. विषारी ताडीविरोधात पुन्हा आम्ही जनआंदोलन छेडणार आहोत.