५०० मिली बॉटलची क्षमता ४५ किलोच्या पोत्याएवढी; पीक उत्पादनातही वाढ होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:16 AM2021-06-26T04:16:54+5:302021-06-26T04:16:54+5:30
इफ्कोच्या नॅनो टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये नॅनो युरियाचे संशोधन व निर्मिती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले ...
इफ्कोच्या नॅनो टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये नॅनो युरियाचे संशोधन व निर्मिती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राष्ट्रीय कृषी संशोधन यंत्रणेंतर्गत २० आयसीआर संशोधन संस्था, राज्य कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्राने ते ४० हून जास्त प्रकारच्या पिकावर या युरियाच्या चाचण्या घेतल्या. देशातील ११ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या ९४ प्रकारच्या पिकावर नॅनो युरियाची यशस्वी चाचणी घेतली आहे. यामध्ये सरासरी ८ टक्के उत्पादनवाढ झाली. त्यामुळे इफ्कोने हे उत्पादन बाजारात आणण्याचे ठरवले आहे.
पारंपरिक युरियाचा वापर घटणार
५०० मिली लिक्विड युरियाची क्षमता ४५ किलो युरियाच्या एका पोत्याएवढी असणार आहे. त्यामुळे त्याची वाहतूक व साठवणुकीच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. शिवाय, या युरियापेक्षा बाटलीची किंमत दहा टक्क्यांनी कमी असणार आहे. ५०० मिली लिक्विड युरियाच्या बाटलीमध्ये ४० हजार पीपीएम नायट्रोजन असून पारंपरिक युरियाच्या पोत्यामध्ये असलेल्या नायट्रोजन पोषणाच्या समतुल्य आहे, अशी माहिती इफ्कोचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र मोरे यांनी दिली.
कोट ::::::::::::::::::
नॅनो लिक्विड युरियाबद्दल शेतकऱ्यांत मोठी उत्सुकता आहे. ५०० मिली बॉटलची ४५ किलो पोत्याएवढी क्षमता आहे, ते सहजरीत्या खिशात घालून नेता येणार असल्याने शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात मोठी बचत होणार आहे.
- सोमनाथ नकाते
ओम अग्रो एजन्सी, मंगळवेढा
कोट ::::::::::::::::::
खत टंचाईवर मात करण्यासाठी व पीक उत्पादन क्षमता वाढवणारा नॅनो लिक्विड युरिया जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत १० हजार बॉटलची नोंदणी झाली आहे. हा लिक्विड युरिया शेतीसाठी सुरक्षित असून, याची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे.
- रवींद्र मोरे
जिल्हा प्रतिनिधी, इफ्को