सोलापुरात ५०० मोटारसायकली खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:51 AM2019-03-18T06:51:42+5:302019-03-18T06:51:56+5:30
अचानक धूर येऊ लागला... आग लागली म्हणता म्हणता सुमारे ५०० मोटरसायकली जळून खाक झाल्या. रविवारी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बझार पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली.
सोलापूर - अचानक धूर येऊ लागला... आग लागली म्हणता म्हणता सुमारे ५०० मोटरसायकली जळून खाक झाल्या. रविवारी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बझार पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. आगीत रिक्षा, टेम्पो व अन्य जप्त करण्यात आलेल्या साहित्यांचे मोठे नुकसान झाले.
सकाळी ११ वाजता सदर बझार पोलीस ठाण्यात कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर होते. अचानक पाठीमागील बाजूने धूर येण्यास सुरुवात झाली. काय झाले हे पाहण्यासाठी पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशनच्या मागे गेले असता मोटरसायकली जळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ अग्निशामक दलास पाचारण केले. दरम्यान, आग इतकी मोठी होती की, पाण्याचा मारा केल्यानंतर बहुतांश गाड्यांचे सांगाडेच फक्त जागेवर दिसू लागले. अग्निशामक दलाच्या ५ बंबांनी सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आणली.
जप्त करण्यात आलेली वाहने...
पोलीस ठाण्याच्या वतीने गेल्या ५ ते ६ वर्षांच्या कालावधीत विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या या मोटारसायकली होत्या. रिक्षा, टेम्पो, चार चाकी कार, फेरीवाल्या हातगाड्या, टपऱ्या, सायकली आदींचा समावेश असून त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.