५ हजाराची लाच घेणारा महावितरण कार्यालयातील सहाय्यक लेखापाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
By Appasaheb.patil | Published: September 15, 2023 09:31 PM2023-09-15T21:31:53+5:302023-09-15T21:32:05+5:30
तक्रारदार यांचे किराणा मालाचे दुकान आहे.
पंढरपूर : शहरातील एका दुकानदारांकडून ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पंढरपुरातील महावितरण कार्यालयातील सहाय्यक लेखापालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदार यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्या दुकानांमध्ये नवीन वीज मीटर घेण्याकरिता तसेच तक्रारदार यांनी शेजारचा दुकानातून लाईट कनेक्शन घेतले म्हणून त्याच्यावर ७० हजार रुपयांचा दंड आकारलेला आहे. असे सांगून तो दंड माफ करण्याकरिता पंढरपूर महावितरण विभागाच्या कार्यालयातील लेखापाल श्रीकांत भीमराव आवाड (वय ३८, रा. फ्लॅट नंबर १०१, एस २, किसान संकुल,जुना विडीघरकुल, सोलापूर) यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीस पंधरा हजार रुपयाची मागणी केली. त्यानंतर तडजोडी अंती ५ हजार रुपयाची लाचेची मागणी करून, ५ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे कबूल करून, ती लाच रक्कम महावितरण कार्यालय पंढरपूर ग्रामीण-२ या कार्यालयाच्या आवारात स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई पुणे परिक्षेत्र ला.प्र.वि. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरीक्त पोलीस अधिक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पो.शि. रियाज शेख, दिनेश माने, मंगेश कांबळे, चालक पो.हवा दिवेकर यांनी केली आहे.