१८ वर्षे पूर्ण नसताना गाडी चालविलेल्या १४ जणांना प्रत्येकी ५ हजाराचा दंड
By Appasaheb.patil | Published: December 8, 2022 03:36 PM2022-12-08T15:36:04+5:302022-12-08T15:36:46+5:30
वाहतूक पोलिसांची कारवाई; सोलापूर ग्रामीण पोलिसांचे पथके तैनात
आप्पासाहेब पाटील
साेलापूर : १६ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना वाहन चालविताना वाहतूक शाखेच्या पथकाने पकडल्यास तब्बल पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो. अल्पवयीनने गुन्हा केल्यास वाहनाच्या मालकाला दोषी ठरवले जाईल. शिवाय दंडही केला जाईल. एवढेच नव्हे, तर तुरुंवासही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच गाडीची नोंदणी एक वर्षासाठी रद्द केली जाईल, असेही वाहतूक शाखेच्या आधिकाऱ्याने सांगितले. मागील दहा महिन्यांत सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेने जिल्ह्यात अशा प्रकारच्या १४ कारवाया केल्या आहेत. प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे ७० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दरम्यान, मोटार वाहन कायद्यातील नव्या सुधारणांमुळे नियम कडक व दंडाची रक्कम वाढविण्यात आली असली तरी त्यासोबत वाहन चालकांसाठी या कायद्यात काही समाधानकारक तरतुदीही करण्यात आल्या आहेत. वाहन परवान्यासाठी अर्ज आणि वाहन नोंदणी आता राज्यातील कुठल्याही आरटीओमध्ये करता येईल, तसेच वाहन परवान्याचे नूतनीकरण करायचे असल्यास वर्षभरात कधीही करू शकता. याआधी एक महिन्याच्या आतच वाहन परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक होते.
दरम्यान, महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले स्टायलिश राहण्यास पसंत करतात. एखाद्या चित्रपटामधील हीरोसारखे राहणेही पसंत करतात. त्या हीरोची स्टाइल, गाडी चालविणे, कपडे यासह अन्य गोष्टींची कॉफी करताना अनेक तरुण आढळतात. त्याप्रमाणे वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) नसताना अनेक मुले महाविद्यालय परिसरात गाड्या चालवितानाचे चित्र नेहमीच दिसून येते. वाहतूक नियमांचे उल्लंघन होईल, असे कृत्य कोणत्याही वाहनधारकाने करू नये. वाहन चालविण्याचा परवाना नसताना कोणत्याही पालकाने आपल्या मुलास वाहन चालविण्यास देणे चुकीचे आहे. चुकून अपघात झाल्यास पश्चात्तापाची वेळ येते. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.
- महेश स्वामी, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण