विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ, ५० हजार विद्यार्थ्यांना मिळाले १३५ कोटी
By Appasaheb.patil | Published: February 24, 2023 06:45 PM2023-02-24T18:45:11+5:302023-02-24T18:45:36+5:30
सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील प्रतीवर्षी अंदाजे ५० हजार विद्यार्थ्यांना रक्कम रुपये १३५ कोटी संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांच्या खात्यावर वितरित करण्यात आली आहे.
सोलापूर - सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील प्रतीवर्षी अंदाजे ५० हजार विद्यार्थ्यांना रक्कम रुपये १३५ कोटी संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांच्या खात्यावर वितरित करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पूर्ण करीत आहेत.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून भारत सरकार शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना महाडीबीटी प्रणालीव्दारे शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सन २०२१-२२ मध्ये अनुसूचित जातीच्या १४ हजार ५९५ विद्यार्थ्यांना ४५ कोटी ५५ लाख रुपये रक्कम वितरीत करण्यात आली. तर विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील ३३ हजार ५८४ विद्यार्थ्यांना ८९ कोटी ९३ लाख रूपये रक्कम वितरीत करण्यात आली.
सोलापूरच्या ए. जी. पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामध्ये क्रांती रावसाहेब रामगुडे ही विद्यार्थिनी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगच्या व्दितीय वर्षात शिकते. तिला शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झाला. अनिकेत नागेशकुमार बोराडे हा डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालयामध्ये एम. कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. एकविसाव्या शतकामध्ये यशस्वी होण्यास अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांची स्पर्धात्मक युगामध्ये जडणघडण व्हावी याकरिता देशातील उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेमुळे शैक्षणिक बळ मिळत असल्याचे सांगण्यात आले.