रेल्वे कारखान्यासाठी ५११ पदे मंजूर, जागा भरल्यास बेरोजगारांना मिळणार जॉब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:28 AM2021-09-17T04:28:00+5:302021-09-17T04:28:00+5:30
केंद्र सरकारच्या जानेवारी महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पात कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला नवीन दोन शेड निर्मिती, संरक्षण भिंत व इतर बांधकामासाठी सुमारे ...
केंद्र सरकारच्या जानेवारी महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पात कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला नवीन दोन शेड निर्मिती, संरक्षण भिंत व इतर बांधकामासाठी सुमारे तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्याचा निधीही उपलब्ध होऊन येथील शेड व बांधकामे पूर्णत्वास आलेली आहेत. कुर्डूवाडी रेल्वे कारखान्यावर शहराचे व परिसराचे भवितव्य अवलंबून आहे. या कारखान्यासाठी येथील कामगार संघटना व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीवारीदेखील केली. त्यामुळे व येथील वरिष्ठ अधिकारी व कामगारांच्या अथक परिश्रमामुळे कारखान्याला वरचेवर चांगले दिवस येत आहेत. या कारखान्यातील मंजूर ५११ जागांपैकी काही नगण्य जागा ह्या आतापर्यंत भरण्यात आल्या आहेत. मात्र, संपूर्ण मंजूर जागा त्वरित भरल्यास या भागात लोकवसाहतीबरोबर आर्थिक उलाढाल वाढणार आहे. रेल्वे कारखान्याला कामही जादाचे व कायमस्वरूपी मिळण्याच्या अपेक्षा आहेत. जागा मंजूर झाल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी एक पत्रकार परिषदेत घेतली होती. मात्र, त्यानंतर त्याची अद्यापही पुढील कार्यवाही प्रत्यक्षात झालेली नाही. त्यामुळे केंद्राच्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या त्यावेळच्या जागा त्वरित भरण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
........................
रेल्वे कारखान्यातील त्या ५११ जागा त्वरित भरल्यास कुर्डूवाडी बाजारपेठेवर चांगला परिणाम होईल. येथील व्यापारीवर्गाला चालना मिळेल. बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळेल. त्यामुळे येथील भरण्यात येणाऱ्या जागेत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी अपेक्षा आहे.
-नितीन पवार, नगरसेवक, कुर्डूवाडी.
.......
(फोटो १७कुर्डूवाडी रेल्वे)