बचत गटांना कर्जपुरवठा करण्यासाठी दिलेल्या रकमेत ५२ लाख ६९ हजार रूपयांचा गैरव्यवहार, पाच महिला बचत गटाच्या सुपरवायझरविरोधात वैराग येथे गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:22 PM2018-02-08T13:22:45+5:302018-02-08T13:24:04+5:30
धान फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी संस्थेअंतर्गत बार्शी तालुक्यातील तडवळे, हत्तीज, गुळपोळी, साकत व वैराग येथे बचत गटांना केलेल्या कर्ज पुरवठा रकमेत ५२ लाख ६९ हजार रूपयांचा गैरव्यहार झाल्याचे उघडकीस आले आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
वैराग दि ८ : धान फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी संस्थेअंतर्गत बार्शी तालुक्यातील तडवळे, हत्तीज, गुळपोळी, साकत व वैराग येथे बचत गटांना केलेल्या कर्ज पुरवठा रकमेत ५२ लाख ६९ हजार रूपयांचा गैरव्यहार झाल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी पाच महिला बचत गटाच्या सुपरवायझर विरोधात गैरव्यवहार करून अन्यायाने विश्वासघात केल्याचा गुन्हा वैराग पोलीसात दाखल करण्यात आला आहे़ हा गैरव्यवहार सन २०१४ ते २०१६ या काळात झाल्याचा प्रकार झालेल्या लेखा परिक्षण उघडकीस आला आहे. बार्शी तालुक्यात धान फाऊंडेशन ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी संस्था आहे. या संस्थेअंतर्गत कलंजियम समुदाय बँकींग कार्यक्रम अंतर्गत बचत गट स्थापन करणे, बचत गटांना कर्ज, विमा, उपजिविके संदर्भात वेगवेगळे प्रशिक्षण देणे, महिलांना सक्षम बनविणे ही प्रमुख उद्दीष्टे या संस्थेची आहेत. त्यानुसार धान फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली सन २०१४ ते २०१८ या काळात तडवळे , वैराग, हत्तीज , साकत, गुळपोळी येथील बचत गटाना संस्थेमार्फत बँकेच्या वतीने कर्ज पुरवठा केला होता़ सदर कर्ज पुरवठ्याची रक्कम बचत गटप्रमुख ( सुपरवायझर ) यांनी गोळा करून ती बँकेत जमा करण्यासाठी त्यांच्याकडे दिली असता ५२ लाख ६९ हजार इतकी रक्कम बँकेत न करता वैयक्तीक कारणासाठी वापरून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे.
यात तडवळे येथील आशा संतोष ताटे यांनी ३० लाख ४६ हजार, हत्तीज येथील लक्ष्मी महादेव मंडलीक हिने १० लाख ६४ हजार रुपए, साकत येथील शुभांगी विद्याधर क्षीरसागर हिने पाच लाख रुपये, गुळपोळी येथील विमल बाबासो सावंत हिने ४ लाख ४५ हजार रुपये, तर वैराग येथील हेमा भगवान सुतार हिने २ लाख १४ हजार असा एकुण ५२ लाख ६९ हजार इतकी रकम बँकेत जमा न करता वैयक्तीक कारणासाठी वापरून गैरव्यवहार करून अन्यायाने विश्वासघात केल्याची फिर्याद जिल्हा प्रांतीय समन्वयक मनिषा आनंद वाघमारे (धान फाऊंडेशन ) यांनी वैराग पोलीसांत दिली़ याबाबत पाच महिला सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत.