युती सरकारच्या काळात ५.३५ लाख कोटी कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:26 AM2019-04-15T06:26:28+5:302019-04-15T06:26:40+5:30
आघाडी सरकारने सत्ता सोडताना या राज्यावर २.८२ लाख कोटींचे कर्ज होते.
सोलापूर : आघाडी सरकारने सत्ता सोडताना या राज्यावर २.८२ लाख कोटींचे कर्ज होते. गेल्या साडेचार वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कर्जाची फेड तर केलीच नाही. याउलट कर्जाचा बोजा वाढला. सध्या ५.३५ लाख कोटी कर्ज असून त्यावरील व्याजापोटी दरवर्षी ६८ हजार कोटींचा भुर्दंड सहन करावा लागत आहे, अशी टीका माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.
मंद्रुप येथील प्रचारसभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, नरेंद्र मोदींनी नोटाबंदी करून सर्वसामान्य जनतेचे संसार उद्ध्वस्त केले. त्यामुळे ज्यांनी नोटाबंदी केली त्यांची वोटबंदी करण्याची हीच वेळ आहे.
सरकार आणि प्रशासनात ताळमेळ नसल्याचे सांगून ते म्हणाले, सोलापुरात एका प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीतून ठाण्यात पोहोचवले.
हा अजब प्रकार आमच्या काळात कधी दिसलाच नव्हता. या चार वर्षांत सरकारच्या अजब तºहा बघायला मिळाल्याचा टोमणा पाटील यांनी मारला.