मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवाला ९५ वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:59 PM2019-08-13T12:59:01+5:302019-08-13T13:01:29+5:30
सोलापुरातील पद्मशाली समाजाचा मोठा उत्सव; नारळी पौर्णिमेस निघते मिरवणूक
सोलापूर : पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवाला ९५ वर्षांची परंपरा आहे. १९२४ साली सिद्धेश्वर पेठेतील सध्या असलेल्या मंदिरात नारळी पौर्णिमेस मार्कंडेय महामुनींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी ३८ पुरोहितांनी धार्मिक विधी पार पाडला.
यानिमित्ताने पहिल्यांदा श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये व्यापारी, विणकर, गिरणी कामगारांसह जवळपास पंधरा हजार समाजबांधव सहकुटुंब सहभागी झाले होते. कॅप्टन परशुराम दुधगुंडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक गणवेशात शिस्तीत सहभागी झाले होते. सरंजाम व वाद्यांसोबत ५० हलग्या, चौघडा, ताशे, बँड, गाड्या-घोडे, मोटारी, मेळे, पताका यासह पोलीस बंदोबस्तात मिरवणूक काढण्यात निघाली.
सोलापुरात पद्मशाली बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. १९२४ च्या दशकात या सर्वांनी एकत्र येऊन काढलेली ही पालखी मिरवणूक त्या दिवशी तब्बल चार तास चालली. ही प्रथा गेल्या ९५ वर्षांपासून आजतागायत चालू आहे. यामध्ये काळानुरूप बदल होत गेले.
आज ही मिरवणूक १२ ते १४ तास चालते. लेझीम, ढोल, टिपरी, विविध नृत्ये यासोबत सूत कातणारी स्त्री, वस्त्र विणणारा विणकर या सजीव देखाव्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
पद्मशाली समाज बांधव नारळी पौर्णिमेला मंदिरात भगवान मार्कंडेयांचे दर्शन घेऊन यज्ञोपवित (जानवे) धारण करतात. ब्राह्मणाकडून सुताची राखी बांधून घेतात. त्यानंतर मंदिरापासून रथोत्सवास सुरुवात होते. यासाठी वापरण्यात येणारा सागवानी रथ मागील पन्नास वर्षांपासून सेवेत आहे. हा रथ लक्ष्मणराव श्रीराम बंधूंनी अर्पण केली आहे. रथावरील चांदीचा मनोरा (अर्क) नरसय्या आकेन यांनी दिला तर यल्लप्पा गुंडला यांनी रथात ठेवण्यात येणारी उत्सव मूर्ती अर्पण केली आहे. त्यास सुवर्णलेप करण्यात आला आहे. रथास बैल जुंपण्याचा मान अंकाराम बंधू यांना सुरुवातीपासून आहे.
असा झाला मिरवणूक मार्गात बदल
- १९२४ मध्ये सुरुवातीला मार्कंडेय पादुकांची पालखी मिरवणूक चाटी गल्ली, मल्लिकार्जुन मंदिर परिसरातून निघायची. त्यात बदल होऊन १९५० च्या नारळी पौर्णिमेस शनिवार पेठ, साखर पेठ, रविवार पेठ या मार्गांचा समावेश करण्यात आला. १९५४ मध्ये रथोत्सवात लाकडी रथाचा समावेश करण्यात आला. पालखीसोबत श्रींची उत्सवमूर्ती रथात ठेवण्यात आली. त्यासोबत समाज बांधवांच्या मागणीनुसार मिरवणूक मार्गात पुन्हा बदल करण्यात आला. त्यात पद्मशाली चौक, दत्त नगर, जोडबसवण्णा चौक, कन्ना चौक असा वाढविण्यात आला.