कर्जमुक्ती योजनेत सोलापूर जिल्ह्यातील ७८ हजार ५२७ शेतकरी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 07:13 PM2020-02-14T19:13:22+5:302020-02-14T19:15:17+5:30
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर याची माहिती; पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर अपलोड
सोलापूर : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ७८ हजार ५२७ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यांनतर त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़ नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, तहसिलदार श्रीकांत पाटील, अग्रणी बँक व्यवस्थापक किसन मोटे आदी उपस्थित होते.
या बैठकीत अग्रणी व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या ७८ हजार ५२७ कर्जदार शेतकºयांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये आणखी काही प्रमाणात शेतकºयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नावे अपलोड करण्याच्या पहिल्या टप्याची मुदत उद्या म्हणजे १५ फेब्रुवारीपर्यंत आहे, असे सोनवणे यांनी सांगितले.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व संबंधितांचे प्रशिक्षण घेण्यात आले. हया प्रशिक्षणात तहसिलदार, गटविकास अधिकारी, गावातील महाआॅनलाईन, आपले सरकार, संग्राम केंद्राचे चालक यांचा समावेश होता. शुक्रवारी करमाळा, माढा, बार्शी आणि मोहोळ या तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये करमाळाचे सहायक निबंधक दीपक तिजोरे, आबासाहेब गावडे यांनी कर्जमाफीची प्रक्रीया कशी राबवावी, काय काळजी घ्यावी याबाबत प्रशिक्षण दिले.