आषाढीत हवी ६० लाखांची चिल्लर
By admin | Published: May 23, 2014 01:09 AM2014-05-23T01:09:53+5:302014-05-23T01:09:53+5:30
स्टेट बँकेकडे मागणी : एक ते पाच रुपयांच्या चिल्लरची मागणी
पंढरपूर : आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरातील व्यापार्यांना व्यवहारासाठी चलनामध्ये मोठ्या प्रमाणात चिल्लर लागते. या यात्रेत स्थानिक व्यापार्यांबरोबरच बाहेरगावाहूनही छोटे-मोठे व्यावसायिक, हातगाडीवाले तसेच फेरीवाले मोठ्या संख्येने पंढरपुरात येतात. या सर्वांना व्यवहारासाठी चलनामध्ये चिल्लरची गरज भासते. मात्र ऐनवेळी चिल्लरचा तुटवडा होतो. येत्या ९ जुलै रोजी होणार्या आषाढीपूर्वी ६० लाख रुपयांच्या चिल्लरची पूर्तता करण्याची गरज निर्माण झाली आहे. आषाढी वारीच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पंढरपूरच्या अर्थकारणाच्या दृष्टीने ही वारी मोठी समजली जाते. या वारीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. या उलाढालीमध्ये व्यवहार करण्यासाठी ऐन वारीत चिल्लरचा तुटवडा पडू नये, यासाठी स्टेट बँकेने ६० लाख रुपयांच्या नाण्यांची व्यवस्था करून पंढरपूर व्यापारी महासंघाला नाणी ५०० व एक हजार रुपयांच्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावीत, असे निवेदन पंढरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड, उपाध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांच्या शिष्टमंडळाने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या व्यवस्थापकांकडे केली आहे. वारीकाळात दानधर्म करण्याचा सुद्धा प्रघात असल्याने भाविकांना चिल्लर हवी असते.
------------
भारतीय स्टेट बँकेने आषाढी वारीसाठी व्यापारी महासंघाला द्यावीत, अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.