जिल्ह्यातील ६० हजार टन बेदाणा कोल्ड स्टोअरेजमध्येच अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:23 AM2021-05-27T04:23:43+5:302021-05-27T04:23:43+5:30

कुर्डूवाडी : लॉकडाऊनमुळे सौदे बंद असल्याने माढा तालुक्यासह जिल्ह्यातून उत्पादित केला गेलेला जवळपास ६० हजार टन बेदाणा सांगली, विजापूर, ...

60,000 tons of raisins in the district got stuck in cold storage | जिल्ह्यातील ६० हजार टन बेदाणा कोल्ड स्टोअरेजमध्येच अडकला

जिल्ह्यातील ६० हजार टन बेदाणा कोल्ड स्टोअरेजमध्येच अडकला

Next

कुर्डूवाडी : लॉकडाऊनमुळे सौदे बंद असल्याने माढा तालुक्यासह जिल्ह्यातून उत्पादित केला गेलेला जवळपास ६० हजार टन बेदाणा सांगली, विजापूर, पंढरपूर व तासगाव बाजारातील स्टोरेजमध्ये पडून आहे. त्यामुळे चालू हंगामात बागेची कामे करताना आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्वतःचा बेदाणा स्टोरेजमध्ये असतानाही इतरांकडून हातउसने किंवा सावकाराकडून व्याजाने पैसे घेण्याची वेळ आली आहे.

माढा तालुक्याबरोबरच पंढरपूर, सांगोला, बार्शी तालुक्यांत द्राक्ष बागेची लागवड गेल्या पाच- दहा वर्षांत जास्त प्रमाणात झाली आहे. येथील शेतकरी हा द्राक्षाची थेट विक्री न करता, त्याचा बेदाणा करतो. त्यांतर सांगली, पंढरपूर, विजापूर व तासगाव येथील बाजारामध्ये त्याची विक्री करतो. यावर्षी लॉकडाऊनच्या काळात अनेक संकटांना सामोरे जात द्राक्ष बागा जोपासत शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घेतले खरे, परंतु सध्याच्या काळात सर्वच व्यवहार बंद असल्याने ग्राहकांकडून मागणी नाही, त्यातच लॉकडाऊनमुळे त्याचे सौदेही बंद असल्याने फटका बसला आहे.

त्यामुळे सरकारने द्राक्ष बागायतदारांना आर्थिक मदत करण्याची वेळ आली आहे. तरच यावर्षीचा हंगाम व्यवस्थित पार पडणार आहे अन्यथा दुहेरी आर्थिक संकटाचा फटका शेतकऱ्याला बसणार आहे. ऑनलाईन बेदाणा खरेदी व विक्री सौदे करण्यासाठीही परवानगी द्यावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदारांतून होत आहे.

---

सांगली, तासगाव, विजापूर व पंढरपूर येथील स्टोरेजमध्ये सध्या राज्यातील विविध भागातून विक्रीसाठी आलेला १.५० लाख टन बेदाणा पडून आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ६० हजार टन बेदाण्याचा समावेश आहे. बेदाण्याचा सरासरी विक्री दर प्रतिकिलो १८० ते २३० रुपये आहे. सोलापूर जिल्ह्यातील बेदाण्यापोटी अंदाजे १२ अब्ज रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

---

उत्पादित केलेला बेदाणा सांगलीच्या स्टोरेजमध्ये पडून आहे. लॉकडाऊनमुळे सौदे बंद आहेत. त्यामुळे द्राक्ष बागायतदार दुहेरी संकटात सापडला आहे. चालू हंगामात मशागत करण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांकडे पैसेही नाहीत. त्यामुळे ऑनलाईन सौदे सरकारने सुरु करावेत किंवा आर्थिक मदत जाहीर करावी.

- नितीन कापसे, द्राक्ष बागायतदार, कापसेवाडी

---

सांगलीच्या स्टोरेजमध्ये राज्यातील दीड लाख टन बेदाणा विक्रीसाठी येऊन पडला आहे. सौदे बंद आहेत. कोरोनामुळे सरकार याला परवानगी देणार नाही. याला पर्यायही उपलब्ध नाहीत. ऑनलाईन सौदे होऊ शकत नाहीत. जरी सरकारने सौदे करण्याची परवानगी दिली तरीही व्यापारी कोरोनामुळे येणार नाहीत. सरकारने आर्थिक मदतच द्यावी.

- भावेश मुजोतिया, संचालक, बेदाणा असोसिएशन, सांगली

Web Title: 60,000 tons of raisins in the district got stuck in cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.