सोलापूरात पाच महिन्यांत पकडली ६२३ मोकाट जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:17 PM2018-09-03T12:17:53+5:302018-09-03T12:21:28+5:30
मालकांचा शोध लागेना : वैरणीवर झाला सव्वा लाख खर्च
सोलापूर : महापालिकेने गेल्या पाच महिन्यात शहरातील भटक्या जनावरांविरुद्ध मोहीम उघडली आहे. ६२३ जनावरे पकडण्यात आली, त्यासाठी वैरणीवर १ लाख २७ हजारांचा खर्च झाला आहे. पकडण्यात आलेल्या जनावरांच्या मालकांचा शोध लागत नसल्यामुळे पालिका प्रशासन वैतागलेले आहे.
शहरातील भटक्या जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. महापालिकेने लावलेली झाडे खाल्ली जातात. कचरा कुंडीत फेकण्यात आलेल्या अन्नावर ही जनावरे व कुत्री जगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी भटकी जनावरे पकडण्याची मोहीम घेण्याचे मंडई विभागाला आदेश दिले. जनावरे पकडण्यासाठी खास पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने एप्रिलमध्ये: ६0, मार्च:९२, जून: २0४, जुलै: १४४, आॅगस्ट: १२३ अशी ६२३ जनावरे पकडली. जे मालक जनावरे सोडवून नेण्यासाठी आले त्यांच्याकडून ४ लाख २४ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. यापैकी २१ गायी गोपालक संघाकडे जमा करण्यात आल्या आहेत.
शहरात अनेकजण गायी मोकाट सोडून देतात. दिवसभर या गायी फिरून कचºयातील चारा शोधत फिरतात.
यामुळे कचरा विखुरला जातो तर प्लास्टिक पिशवीतील अन्न खाण्याच्या नादात अनेक गायी या पिशव्याही गिळंकृत करतात. चरणे झाल्यावर ही जनावरे कळपाने चौकात बसकन मारतात.
भटकी जनावरे पकडण्यासाठी मंडई विभागाकडे खास व्हॅन आहे. पण इंधन नसल्याने व मेन्टनससाठी ही व्हॅन अनेकवेळा बंद राहते. कोंडवाड्यातही जनावरांना मोकळे वातावरण ठेवण्याची गरज आहे. ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे अधीक्षक अखलाक चांदा यांनी सांगितले.
मोकाट जनावरांमुळे अपघात
- मोठ्या प्रमाणावर गाढव मोकाटपणे फिरताना आढळतात. यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. भटक्या जनावरांची संख्या कमी व्हावी म्हणून दंड तीनपटीने वाढविण्यात आला आहे. याचा फटका काही मालकांना बसला आहे. पण तरीही अनेकजण पकडून नेलेल्या गायी कोंडवाड्यात दंड भरून आणतात व परत रस्त्यावर सोडून देत असल्याचे दिसून आले आहे.
कोंडवाड्यात ठेवण्यात येणाºया जनावरांच्या दंडात वाढ केली आहे. त्यामुळे या जनावरांची निगा राखली पाहिजे. सर्वच जनावरांना पुरेसा चारा देणे आवश्यक आहे. जनावरांची काळजी घेतली जाते की, नाही हे पशुवैद्यकीय अधिकाºयांनी वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे.
- संजय कोळी, सभागृहनेते , सोलापूर महानगर पालिका