मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारकासाठी ६५ एकर जागा निश्चित, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची माहिती, स्मारकासोबत कृषी पर्यटन केंद्रही उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:05 PM2018-02-09T13:05:53+5:302018-02-09T13:08:11+5:30
मंगळवेढ्याजवळील कृषी विभागाच्या ६५ एकर जागेवर महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक आणि आधुनिक कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचा आराखडा १५ दिवसात राज्य शासनाकडे पाठवावा.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९ : मंगळवेढ्याजवळील कृषी विभागाच्या ६५ एकर जागेवर महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक आणि आधुनिक कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचा आराखडा १५ दिवसात राज्य शासनाकडे पाठवावा. यासाठी ग्रामविकास आणि सामान्य प्रशासन विभागाने विहित केलेल्या धोरणातील तरतुदींचा अवलंब करावा, असे आदेश पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी दिले.
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक समितीची बैठक पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, समिती सदस्य माजी आमदार गंगाधर पटणे, मनोहर पटवारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, समिती सदस्य गुरुनाथ बडुरे, उदय चोंडे, पुरातत्त्व खात्याचे एच. जे. दसरे, नगररचना विभागाचे प्रभाकर वाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंता सुरेश राऊत आदी उपस्थित होते.
आघाडी सरकारच्या काळात मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर भाजप सरकारच्या काळात यासाठी २ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. या स्मारकासाठी कृृषी विभागाने जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे.
पालकमंत्री देशमुख म्हणाले, स्मारकाच्या उभारणीसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणानुसार आराखडा येत्या १५ दिवसात तयार करावा, तो मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे सादर करावा. यासाठी महात्मा बसवेश्वर यांच्या कर्नाटकात असलेल्या स्मारकांची पाहणी करावी. त्याचबरोबर या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मते विचारात घ्यावीत. स्मारकाची उभारणी झाल्यावर त्याची देखभाल आणि संनियंत्रण स्थानिक संस्थेकडे अथवा नगरपरिषदेकडे देता येईल, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी कृषी विभागाची जमीन दिली जाईल. त्यातील काही भाग स्मारकासाठी तर उर्वरित भागात कृषी पर्यटन आणि संशोधन केंद्र विकसित केले जावे, अशा सूचना असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्मारक समितीच्या कामकाजाबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, अशा सूचना दिल्या.
-------------------------
प्रथम आराखडा, नंतर अंमलबजावणीच्या यंत्रणेचे ठरवू...
- माजी आमदार गंगाधर पटणे यांनी स्मारकाच्या उभारणीसाठी प्राधिकरण स्थापन केले जावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी स्मारकाचा आराखडा तयार करून नियोजन विभागाला सादर करावा. आराखडा सादर झाल्यानंतर प्रत्यक्षात निधीची तरतूद होईल. यानंतर प्रत्यक्ष काम कोणत्या यंत्रणेमार्फत करावे हे ठरवता येईल, असे सांगितले.
------------------------
५० कोटी निधी लागणार
- कृषी विभागाच्या या जागेवर आधुनिक कृषी विकास पर्यटन केंद्र होणार आहे. त्याचबरोबर स्मारकाच्या ठिकाणी शासन निर्णयानुसार वाचनालय, अभ्यासिका, महात्मा बसवेश्वर यांचे जीवनदर्शन घडविणारी शिल्पे आदींचा समावेश असेल. यासाठी तज्ज्ञांकडून मतेही मागविली जाणार आहेत.