धक्कादायक; जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षणात सोलापूर जिल्ह्यात आढळली ६५ कुपोषित बालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:00 PM2020-11-27T16:00:51+5:302020-11-27T16:04:03+5:30
आरोग्य विभागाशी समन्वयाने काम करण्याची पर्यवेक्षिकांना सूचना
सोलापूर : जिल्ह्यात ६५ बालके अतितीत्र कुपोषित आढळली आहेत. हे प्रमाण कमी असले तरी ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याबाबत अंगणवाडी पर्यवेक्षिकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी फैलावर घेतले. कुपोषितचे प्रमाण शून्यावर आणणे व कोरोना साथीसाठी आरोग्य विभागाबरोबर समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाची आढावा बैठक गुरुवारी दुपारी सभागृहात झाली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. पहिल्यांदा जिल्हा बालविकास अधिकारी जावेद शेख यांनी प्रकल्पाची माहिती दिली. कुपोषण निर्मूलन, बालआधार नोंदणी, ग्राम बालविकास केंद्र, अंगणवाडी इमारत बांधकाम व दुरुस्ती व माझी कन्या भाग्यश्री या योजना राबविल्या जातात. आधार नोंदणीचे काम ७४ टक्के झाले असून, कोरोना साथीमुळे थांबले आहे. १६७४ अंगणवाडी केंद्रांना आयएसओ मानांकन मिळाल्याचे नमूद केले. कुपोषण निर्मूलन व माझी कन्या भाग्यश्री योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविकांनी काम करावे. प्रति बीट दोन प्रस्ताव पुढील महिन्यात आले पाहिजेत. डिसेंबरमध्ये लग्नसराई असल्याने याचा फायदा घेता येईल, असे सुचविले.
बांधकामे तातडीने पूर्ण करा
गतवर्षीच्या ५२ बांधकामाच्या ई-निविदा झाल्या नसल्याचे सांगितल्यावर सीईओ स्वामी यांनी पुढील महिन्यात ही कामे पूर्ण करा, अशा सूचना दिल्या. बैठकीला कनिष्ठ प्रशासन अधिकारी गिरीश जाधव, समन्वयक राजन माळगे, गणेश साळुंखे, प्रकल्प सहायक अर्चना जाधव उपस्थित होते.
- फोटो