६५ वर्षीय वयोवृध्द भाविकाची घोड्यावरून शिंगणापूर वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 04:25 PM2019-04-17T16:25:56+5:302019-04-17T16:28:27+5:30
देवाच्या पावन नगरीत गेल्यानंतर एक आत्मिक समाधान मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
माळशिरस : डोक्यावर भगवा फेटा. पांढरा शर्ट अन् धोतर परिधान केलेले. पिशवीत गुंडाळून ठेवलेला भगवा झेंडा. घोड्याच्या पाठीवर जुजबी साहित्य लादून शिखर शिंगणापूरच्या मार्गाने स्वार होऊन निघालेले एक वृद्ध दिसले. त्यांचे नाव रामचंद्र कोरके-पाटील. भोसे (ता़ पंढरपूर) येथील ते रहिवासी. देवाच्या पावन नगरीत गेल्यानंतर एक आत्मिक समाधान मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
रामचंद्र कोरके-पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, महाराष्ट्रात सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. अनेक कुटुंबात देवाला जाऊन वारी करण्याची परंपरा आहे. त्या परंपरेनुसारच आमच्याही कुटुंबात शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला वारी करण्याची परंपरा आहे. पूर्वीच्या काळी दळणवळणासाठी बैलगाड्या, घोडा गाड्या वापरल्या जात होत्या. त्यांची जागा आता विविध प्रकारच्या वाहनांनी घेतली आहे. मात्र मी अद्यापही घोड्यावरूनच शिखर शिंगणापूरची वारी करतो. यंदाचे ३२ वे वर्षे असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या शिखर शिंगणापूरची यात्रा सुरू असून राज्यभरातून अनेक भाविक यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. सध्या अनेक भाविक जीप, टेम्पो, मोटरसायकल अशा विविध वाहनांच्या साह्याने शिंगणापूरला ये-जा करतात, मात्र जुनी परंपरा जोपासत अजूनही घोड्यावरून मी प्रवास करतो.
दोन पिढ्यांपासून आमची ही वारी सुरू आहे. केवळ शिखर शिंगणापूरच नव्हे तर पंढरपूर, देहू, आळंदी, अरण अशा विविध तीर्थक्षेत्रांना ही मी घोड्यावरून जातो, असे त्यांनी सांगितले. सध्या प्रवासासाठी वापरला जाणारा घोडा सांभाळणे मुश्कील झाले आहे. इतकेच नाही तर पशूप्रेमही कमी झाल्याचे दिसून येते. मात्र आमच्या परिवारात कायम घोडा सांभाळला जातोय. ती परंपरा मीही सांभाळत आलो आहे, रामचंद्र कोरके-पाटील हे सांगत होते.
असा असतो नित्यक्रम
- रामचंद्र कोरके-पाटील म्हणाले, दररोज मोजका प्रवास करायचा. मुक्कामाच्या ठिकाणी लवकरच थांबायचं. वाटेतील गावामध्ये महादेवाचे मंदिरातच मुक्काम करायचा. पुन्हा सकाळी लवकर प्रवासाला लागायचे. शक्यतो सकाळी आणि सायंकाळी प्रवास करतो. दुपारी उन्हात विश्रांती करतो़, असा दिनक्रम आहे. शिखर शिंगणापूरला पोहोचल्यानंतर शिखराला प्रदक्षिणा घालायची व माघारी फिरायचे असा प्रतिवर्षी करतो, असे ते सांगत होते.