६६ टनांचे गर्डर ४ तास २० मिनिटात उभारले; दोन महिन्यात होणार मजरेवाडीचा रेल्वे पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 02:33 PM2018-12-07T14:33:57+5:302018-12-07T14:36:07+5:30
आप्पासाहेब पाटील सोलापूर : ‘अॅन मॅन गेट’ योजनेंतर्गत मध्य रेल्वेने पूल उभारणीचे काम मागील वर्षभरापूर्वी हाती घेतले होते़ आतापर्यंत ...
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : ‘अॅन मॅन गेट’ योजनेंतर्गत मध्य रेल्वेने पूल उभारणीचे काम मागील वर्षभरापूर्वी हाती घेतले होते़ आतापर्यंत सोलापूर ते दुधनी मार्गावर १८ पैकी १६ गेटचे काम पूर्ण झाले आहे़ राहिलेल्या मजरेवाडी-आसरा पुलाचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले असून गुरूवारी या कामाला शुभारंभ झाला़ दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी सुरू करण्यात आलेले काम सायंकाळी ५ वाजता संपले़ ६६ टन वजन असलेले गर्डर बसविण्याचे काम ४ तास २० मिनिटांत उरकले़ येत्या दोन महिन्यात मजरेवाडीचा पूल नव्याने उभारला जाणार असून आसरा-मजरेवाडी दरम्यानची वाहतूक सुरळीत होणार आहे.
वर्षभरापूर्वी सोलापूर-दुधनी मार्गावर गेट काढून पूल उभारणी करण्याचे काम सुरू झाले़ मागील वर्षी टिकेकरवाडीजवळील पुलाची उभारणी करून कुमठे मार्गावरची वाहतूक सुरळीत केली़ त्यानंतर मजरेवाडीचे काम हाती घेण्यात आले़
आसरा पुलावरून दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूरमधील होणाºया उसाची वाहतूक छोट्या गेटमुळे अडून राहायची़ परिणाम: वाहतूक ठप्प होत होती़ तसेच दुचाकी, चारचाकी आणि किरकोळ प्रवासी वाहतूक खोळंबली जात होती़ याचा फटका विद्यार्थी, नोकरदार, मजूर आणि काही कारखानदारांना बसत होता़ काही दिवसांपूर्वी नगरसेविका मनीषा हुच्चे यांनी या पुलासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे काही सूचना केल्या होत्या़ त्यानुसार या कामाला गुरूवारी मुहूर्त मिळाला़ रेल्वे प्रशासनाचे पथक सकाळी दहा वाजता घटनास्थळी दाखल झाले़ दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी या कामास प्रारंभ झाला़ या पुलाच्या कामावेळी रेल्वे अधिकारी यांच्यासह बिल्डर असोसिएशनचे उपाध्यक्ष अमर बिराजदार, हणमंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
८ तास वीजपुरवठा खंडित
- सोलापूर-टिकेकरवाडीदरम्यान रेल्वे पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला होता़ या रेल्वे रुळावरून गेलेल्या तारा तात्पुरत्या स्वरूपात काढण्यात आल्या होत्या़ पुलाच्या कामासाठी महावितरणच्या हत्तुरे विभागाकडून सकाळी ९ वाजता वीज बंद करण्यात आली होती़ दिवसभराच्या कामानंतर सायंकाळी ५ वाजता वीज पूर्ववत सुरू केली़ दिवसभरात ८ तास वीज बंद ठेवण्यात आली होती़ यामुळे कुमार नगर, जय प्लाझा, ताकमोगे वस्ती, समर्थ नगर, कल्याण नगर भाग १ आदी परिसरातील वीज गायब झाली होती़
या गाड्यांचा मार्ग बदलला/शॉर्ट टर्मिनेट केला
- - बबलाद-कलबुर्गी रेल्वे स्टेशनदरम्यान पीएससी स्लॅबच्या पुनर्बांधणीकरिता ६ तास व सोलापूर -टिकेकरवाडी रेल्वे स्टेशनदरम्यानच्या उपमार्ग बांधकाम करण्याकरिता ४ तासांचा ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात आला होता़ या दरम्यान मुंबई ते चेन्नई ही गाडी होटगी-गदग-गुंटकल, भुवनेश्वर ते मुंबई ही गाडी सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूवाडी तर विशाखापट्टणम ते एलटीटी ही गाडी सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूवाडीदरम्यान मार्ग बदलण्यात आला होता.
- - याशिवाय सोलापूर-फलुकनामा पॅसेंजर ही गाडी गुरूवारी दुधनीपर्यंत व दुधनीहून फलुकनामा ही निर्धारित वेळेत धावली़ दुधनी ते कलबुर्गीदरम्यानची गाडी धावली नाही.
- - रायचूर-बिजापूर ही गाडी कलबुर्गीपर्यंत धावली आणि कलबुर्गीहून सोलापूर-फलुकनामाप्रमाणे ही गाडी निर्धारित वेळेत धावली़ याचवेळी कलबुर्गी ते दुधनीदरम्यान रायचूर-बिजापूर ही गाडी धावली नाही़
- - बिजापूर-रायचूर ही गाडी होटगीपर्यंत धावली़ होटगीहून ही गाडी होटगी ते रायचूरपर्यंत निर्धारित वेळेत धावली़ मात्र ही गाडी होटगी-सोलापूर-होटगीदरम्यान धावली नाही़
- - म्हैसूर-सोलापूर ही गाडी गुरूवारी होटगीपर्यंत निर्धारित वेळेत धावली
या गाड्या उशिराने धावल्या़...
- गाडी क्रमांक ५७६२८ कलबुर्गी ते सोलापूर आपल्या वेळेपेक्षा १ तास १० मिनिटे उशिरा धावली़ हीच गाडी कलबुर्गी स्थानकावरून संध्याकाळी ५़२० वाजता सुटली़
- गाडी क्रमांक ११०२८ मद्रास मेल वाडी-कलबुर्गी स्थानकादरम्यानची गाडी १ तास ३५ मिनिटे उशिराने धावली़
- गाडी क्रमांक १८५२० एलटीटी-विशाखापट्टणम सोलापूर-बबलाद स्थानकादरम्यान १ तास ४० मिनिटे उशिराने धावली़
- गाडी क्रमांक १२०२६ सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस ही गाडी वाडी-कलबुर्गी स्थानकादरम्यान २५ मिनिटे उशिराने धावली़
ट्रॅकमेंटेनर, मिस्त्री, हेल्पर तैनात
सोलापूर-टिकेकरवाडीदरम्यान मजरेवाडी येथील गेट नं. ५७ च्या पुलाच्या कामासाठी २०० हून अधिक ट्रॅकमेंटेनर (गँगमन), मिस्त्री, हेल्पर आदी रेल्वे विभागातील अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते़ सकाळी १२ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत या अधिकारी, कर्मचाºयांनी यशस्वी भूमिका बजावली.
३ क्रेन, २ पोकलेन, ३ जेसीबी, ३ टिपर
पुलाच्या कामासाठी गुरूवारी ब्लॉकच्या दिवसाच्या कामावेळी मजरेवाडी गेटजवळ ३ क्रेन, २ पोकलेन, ३ जेसीबी, ३ टिपर सज्ज ठेवण्यात आले होते़ यातील सर्वात मोठा क्रेन हैदराबादहून मागविण्यात आला होता काम करताना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती़